
सरकारला अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडू, असा आत्मविश्वास व्यक्त करत सत्यशोधक कष्टकरी सभेचे पदाधिकारी आणि खानदेशातील अनेक शेतकरी रविवारी रात्री दिल्लीकडे रवाना झाले.
धुळे : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांना पंजाब आणि हरियाणातील शेतकरी टोकाचा विरोध करीत आहेत. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३७ जणांचा मृत्यु झाला आहे. कुठल्याही स्थितीत शेतकरी झुकणार नाहीत. आंदोलक शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आम्हीही दिल्लीच्या दिशेने जात आहोत, अशी माहिती सत्यशोधक शेतकरी, कष्टकरी सभेचे नेते सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले यांनी दिली.
सरकारला अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडू, असा आत्मविश्वास व्यक्त करत सत्यशोधक कष्टकरी सभेचे पदाधिकारी आणि खानदेशातील अनेक शेतकरी रविवारी रात्री दिल्लीकडे रवाना झाले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील साक्री, नवापूर, नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण या भागातील आंदोलकांचा जत्था रविवारी सायंकाळनंतर येथे दाखल झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलक शेतकऱ्यांचे स्वागत झाले. पायी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी आंदोलकांना बिस्किटांचे वाटप केले. एम. जी. धिवरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, माजी आमदार शरद पाटील, जमाते उलेमा हिंदचे गुफरान पोपटवाले, अंनिसचे नवल ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे चक्षुमल बोरसे, नितीन वाघ, संविधान संरक्षण समितीचे हरिश्चंद्र लोंढे, काँग्रेस इंटकचे प्रमोद सिसोदे, काँग्रेसचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले, कम्युनिस्ट पक्षाचे एल. आर. राव, महेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते.