
एक वर्ष होऊनही अद्यापही हजारो वाहनांना फास्टॅग नाही. दरम्यान, टोल प्लाझावर फास्टॅग असलेल्या व नसलेल्या वाहनांसाठी टोल प्लाझावर स्वतंत्र व्यवस्था असली तरी महामार्गावर एकच ट्रॅक असल्याने सर्व वाहने अडकतात.
सोनगीर (जळगाव) : टोल प्लाझावर वाहनांच्या रांगा कमी करून वाहनचालकांच्या वेळेची बचत करण्यासाठी रविवारी (ता. १४) रात्री बारापासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग आवश्यक केले आहे. असे असले तरी टोल प्लाझावर वाहनांची गर्दी कायम होती. परिणामी वाहनचालकांना अर्ध्या तासाहून अधिक तिष्ठत राहावे लागत असल्याने चालकांचे व फास्टॅगधारकांचे हाल होत आहेत. दरम्यान, फास्टॅग नसलेल्यांना दुप्पट टोलवसुली झाली आहे.
येथील टोल प्लाझावर गेल्या वर्षी १ डिसेंबरपासून फास्टॅग योजना सुरू झाली. योजनेला १५ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ दिली होती. एक वर्ष होऊनही अद्यापही हजारो वाहनांना फास्टॅग नाही. दरम्यान, टोल प्लाझावर फास्टॅग असलेल्या व नसलेल्या वाहनांसाठी टोल प्लाझावर स्वतंत्र व्यवस्था असली तरी महामार्गावर एकच ट्रॅक असल्याने सर्व वाहने अडकतात. फास्टॅग घेण्यास वाहनचालकांचा अद्यापही फारसा प्रतिसाद नाही. धुळे ते सोनगीर अवघे २० मिनिटे लागतात, परंतु टोल प्लाझावरील गर्दीमुळे एक तास जातो. टोल प्लाझाने वाहनचालकांना दुप्पट टोलपासून वाचविण्यासाठी फास्टॅग घेण्याचे आवाहन केले आहे.
फास्टॅग सेवा अत्यावश्यक झाली आहे. अजूनही अनेक वाहनचालकांनी फास्टॅग न घेतल्याने टोल प्लाझावर रांगा लागत असल्या तरी लवकरच ही परिस्थिती निवळेल, अशी अपेक्षा आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून शासन आदेशान्वये दुप्पट टोल वसूल केला जात आहे. त्याला कोणतीही मुदतवाढ दिली नाही.
- हरीश जाधव, जनसंपर्क अधिकारी, सोनगीर टोल प्लाझा