esakal | सिलिंडरचा स्‍फोट..सुदैवाने जीव तर वाचला पण संसार उघड्यावर पडला

बोलून बातमी शोधा

house fire
सिलिंडरचा स्‍फोट..सुदैवाने जीव तर वाचला पण संसार उघड्यावर पडला
sakal_logo
By
टिम इ सकाळ

दोंडाईचा (धुळे) : रहिमपुरे (ता. शिंदखेडा) येथे गॅस सिलिंडरच्या स्फोट होऊन घराला भीषण आग लागली. आगीत २१ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्‍थ व अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नाने तब्बल तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

रहिमपुरे येथील निंबा पाटील व विश्वास पाटील यांचे लाकडाचे घर लगत आहेत. बुधवारी (ता. २८) नेहमीप्रमाणे जेवण करून ते बाहेर झोपले होते. रात्री नऊच्या सुमारास अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घरात आगीचा एकच लोड निर्माण झाला. कोणालाच काही सुचेनासे झाले. आगीचे रौद्ररूप पाहून ‍धावपळ उडाली. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, लाकडी घर असल्याने आगीचे तांडव अधिक वाढले. घरातील संसारापयोगी वस्तू व रोकड आगीत खाक झाली. सुमारे २१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतिनिधी कामराज निकम, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, सहाय्यक निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील, पोलिस कर्मचारी योगेश पाटील, श्री साळुंखे, मंडलाधिकारी महेशकुमार शास्त्री, दोंडाईचा तलाठी संजीव गोस्वावी, दीपक ईशी आदी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या दोंडाईचा व शिंदखेडा येथील दोन बंबांनी रात्री आग आटोक्यात आणली.

रोकड, दागिन्यांचाही कोळसा

विश्वास पाटील यांच्या घरात दीड लाखाची रोकड, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, तीन तोळे सोन्याचे दागिने, घरघंटी चक्की, टीव्ही, फ्रीज, शिलाई मशीन, फवारणी पंप, पंखा, रासायनिक खत, घरगुती साहित्य असे एकूण सहा लाख पाच हजार आठशे रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाले, तर निंबा पाटील यांच्या घरात सात लाखांची रोकड, २४ ग्रॅम सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रिज, फॅन, हरभरे बियाणे, घरगुती वस्तू असे दहा लाख ७३ हजार रुपयांचे साहित्य खाक झाले आहे. तसेच दोन्ही घरांची किंमत सुमारे चार लाख २० हजार रुपये आहे. या घटनेमुळे सुमारे २१ लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी दीपक ईसी यांनी केला आहे.