बारीपाड्यासारख्या गावांमुळेच भारत होईल आत्मनिर्भर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

governor bhagat singh koshyari
governor bhagat singh koshyari

धुळे : बारीपाडा येथे जल, जंगल, जमिनीचे संवर्धन करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळेच ग्रामीण भारतातील गावे आत्मनिर्भर होवून देश आत्मनिर्भर होण्यास मदत होईल’ असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. 
साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील पर्यावरण अभ्यास केंद्रात सामूहिक वनहक्क अधिकार पत्राचे वितरण राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सरपंच सुनीता बागूल, बारीपाडा गावाचे शिल्पकार चैत्राम पवार, मोतीराम पवार, विजय पवार उपस्थित होते. 
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, जंगल हे जीवसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मानवाने जंगलाचे रक्षण केल्यास त्याचा लाभ नक्कीच होतो. बारीपाडा येथे चैत्राम पवार यांनी उभे केलेले काम आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांनी उभारलेले काम कौतुकास्पद आहे. 

घडविलेला बदल अनुकरणीय
जमीन, जंगल आणि जल या त्रिसूत्रीवर येथे काम होत आहे. ज्या गावात जमीन आहे, तेथे जंगल उभे राहते अशा ठिकाणी कधीही पाऊस कमी पडत नाही, असे सांगून ते म्हणाले, की श्री. पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेवून गावाचा विकास केला आहे. बारीपाडासारख्या आदिवासी गावात आदिवासी विकास, कृषी, महसूल आणि वन विभागाच्या सहकार्याने गावकऱ्यांनी घडविलेला बदल अनुकरणीय आहे. गाव विकासाचा हा रथ पुढे नेवून अन्य गावांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

आदीवासी नृत्‍याने कोश्‍यारींचे स्‍वागत
राज्यपाल यांच्या आगमनानिमित्त आदिवासी बांधवांनी गेर, शिबली आदी नृत्य सादर केली. नृत्याचा आनंद घेताना कोश्यारी यांनी नृत्यास भरभरुन दाद दिली. पर्यावरण अभ्यास केंद्राचे प्रमुख श्री. पवार यांनी प्रास्ताविकात बारीपाडा विकासाची माहिती दिली. तसेच पर्यावरण अभ्यास केंद्राने बारीपाडा गावाच्या विकासावर आधारित भरविलेल्या प्रदर्शनाची राज्यपाल कोश्यारी यांनी पाहणी केली. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, राजभवनचे प्रधान सचिव संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंघल, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित आदी उपस्‍थित होते.

लोकप्रतिनिधींशी साधला संवाद 
पर्यावरण अभ्यास केंद्रातील सभागृहात राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळा गावित, माजी खासदार बापू चौरे, डी. एस. अहिरे, साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com