
महापालिकेच्या आवारात राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते होत असलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महापालिकेत दुपारी बाराला पत्रकार परिषद झाली.
धुळे : कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या वीस जणांचा उद्या (ता.४) दुपारी बाराला महापालिकेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याहस्ते कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येईल अशी माहिती महापौर चंद्रकांत सोनार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली.
महापालिकेच्या आवारात राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते होत असलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महापालिकेत दुपारी बाराला पत्रकार परिषद झाली. महापौर श्री. सोनार, श्री. अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, विरोधी पक्षनेते साबीर शेठ, महिला बालकल्याण सभापती स्नेहल जाधव, नगरसेवक उपस्थित होते.
राज्यपालांचा असा असेल दौरा
राज्यपाल कोश्यारी यांचे उद्या (ता.४) दुपारी १२ वाजून पाच मिनिटांनी महापालिकेत आगमन होईल. महापालिकेतील कार्यक्रमासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी ४० मिनिटांचा अवधी दिला आहे. यातील १० मिनिटे कोरोना योध्दांचा सत्कार होईल तर १० मिनिटे राज्यपाल कोश्यारी मार्गदर्शन करतील. महापौर श्री. सोनार प्रास्ताविक करतील, आयुक्त अजीज शेख आभार व्यक्त करतील. उपमहापौर कल्याणी अंपळकर राज्यपालांचे औक्षण करतील. महापौर श्री. सोनार व आयुक्त शेख राज्यपाल कोश्यारी यांचा सत्कार करतील. खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार फारुक शाह, महापौर श्री. सोनार, आयुक्त अजीज शेख असे पाच जण मंचावर असतील.
वीस जणांचा होणार सत्कार
कोरोना काळात रिकव्हरी रेटमध्ये राज्यात धुळे जिल्ह्याला प्रथम आणण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत. त्यातील ठरावीक कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत आहोत. यात राजकीय व्यक्तींचा समावेश नसल्याचे श्री. अग्रवाल यांनी स्पष्ट केले. सत्कारासाठी वीस जणांची यादी तयार केल्याचेही अग्रवाल म्हणाले.
संपादन ः राजेश सोनवणे