अंगणवाडी मदतनीस बनली सरपंच 

भगवान जगदाळे
Monday, 15 February 2021

सरपंच, उपसरपंच यांची बिनविरोध निवड जाहीर होताच शहर विकास आघाडीचे समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली.

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वांत मोठ्या सतरा सदस्यीय जैताणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शहर विकास आघाडीच्या कविता मुजगे यांची, तर उपसरपंचपदी कविता शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सोमवारी (ता. १५) दुपारी दोनला ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभा झाली. 
पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी विजय पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, तलाठी भूषण रोजेकर, लिपिक यादव भदाणे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले. सरपंचपदासाठी सौ. मुजगे व उपसरपंचपदासाठी सौ. शेवाळे यांचेच अर्ज मुदतीत दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पवार यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. विशेष सभेला १७ पैकी १६ सदस्य हजर होते. त्यात सरपंच कविता मुजगे, उपसरपंच कविता शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ पगारे, बाजीराव पगारे, श्याम भलकारे, गणेश न्याहळदे, अश्विनी बोरसे, रमणबाई चौधरी, सत्तारखान मणियार, हिम्मत मोरे, संगीता मोरे, समाधान महाले, राजेश बागूल, सायंकाबाई सोनवणे, अनिता जाधव, तनुजा जाधव आदींचा समावेश आहे. ग्रामविकास पॅनलच्या ग्रामपंचायत सदस्या जिजाबाई न्याहळदे मात्र विशेष सभेस अनुपस्थित होत्या. 

वाजतगाजत मिरवणूक
सरपंच, उपसरपंच यांची बिनविरोध निवड जाहीर होताच शहर विकास आघाडीचे समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली. शहर विकास आघाडीप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. नवनिर्वाचित सरपंच सौ. मुजगे यांचा अंगणवाडी मदतनीस ते सरपंचपदापर्यंतचा प्रवास महिलांसाठी प्रेरणादायी आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat election anganwadi madatnis sarpanch