गठ्ठा मतदान विभागल्याने भाऊबंदकीची पंचायत 

जगन्‍नाथ पाटील
Friday, 18 December 2020

इच्छुकांनी भाऊबंदकीच्या गुप्त बैठका घेण्यास सुरवात केली आहे. भाऊबंदकीत आमची अधिक घरे आहेत. आमचा उमेदवार असेल, यावरून वादविवादही घडत आहेत. बऱ्याच ठिकाणी सख्खे काका, पुतण्या व भाऊ, भावजयी इच्छुक असल्याने आगामी लढती रंगतदार होणार आहेत.

कापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. इच्छुक कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी धावपळ करीत आहेत. येथील पंचायतीच्या प्रभागांची अस्ताव्यस्त रचना झाली आहे. एकाच गल्लीतील मतदारांची नावे तीन प्रभांगांमध्ये विभागली गेली आहेत. यामुळे गठ्ठा मतदान असलेल्या भाऊबंदकीची चांगलीच पंचायत झाली आहे. अपील करण्याची मुदत निघून गेल्याने इच्छुकांमधून नाराजी व्यक्त होत आहे, तर इच्छुकांनी भाऊबंदकीच्या गुप्त बैठका घ्यायला सुरवात केली आहे. ऐन थंडीत वातावरण तापू लागले आहे. 

कागदपत्रांसाठी धावपळ 
२३ डिसेंबरपासून उमेदवारीचे अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व जमातीतील इच्छुक उमेदवार जातीचा दाखला काढण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करू लागले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये जन्म दाखला काढण्यासाठी धावपळ होत आहे. व्हॅलीटीडीसाठी केवळ टोकन आवश्यक असल्याने इच्छुकांना हायसे वाटले आहे. 

काका पुतण्या, भाऊ भावजयीही इच्छुक 
२१८ गावांमध्ये इच्छुकांनी बैठका घेण्यास सुरवात केली आहे. येथील इच्छुकांनी भाऊबंदकीच्या गुप्त बैठका घेण्यास सुरवात केली आहे. भाऊबंदकीत आमची अधिक घरे आहेत. आमचा उमेदवार असेल, यावरून वादविवादही घडत आहेत. बऱ्याच ठिकाणी सख्खे काका, पुतण्या व भाऊ, भावजयी इच्छुक असल्याने आगामी लढती रंगतदार होणार आहेत. 
दरम्यान, थंडीचा जोर वाढू लागला आहे. ऐन थंडीतही निवडणुकीच्या गरमागरम चर्चा सुरू झाल्या आहेत. हलकसे वादविवादही सुरू झाले आहेत. ऐन थंडीत वातावरण तापत चालले आहे. 

कापडणे ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय मतदार व जागा 
प्रभाग / पुरुष / स्री / एकूण / जागा 

१) /७२५ / ६४६ / १३७१/३ 
२) /९९९ /८२९ / १८२९ /३ 
३) /११८५/११७१ / २३५६/२ 
४) /८७५ /८२० / १६९५ /३ 
५) /८३४ /७८५ / १६१९ /३ 
६) /७२२/६६२ /१३८४ /३ 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat election candidate selection in family