
ग्रामपंचायतींची निवड बिनविरोधवर आज शिक्कामोर्तब झाले. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी त्या - त्या विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी आमदार निधीतील रक्कमेतील काही लाखांची बक्षिसेही घोषीत केली आहेत.
कापडणे (धुळे) : धुळे जिल्ह्यातील दोनशेवर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी माघारीची मुदत सोमवारी (ता.४) संपल्यानंतर मंगळवारी (ता. ५) प्रचाराचा नारळ वाढविले जातील. रिंगणात असलेल्या उमेदवारांनी जिंकून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेद, विनंती, उपकार, चमत्कार, साष्टांग दंडवत या नवसुत्रीचा वापर करण्याचा निर्धार केल्याचे समर्थकांच्या व्युहरचनेवरुन पुढे येत आहे. ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत प्रचाराचे नारळ वाढविण्यासाठी शक्ती प्रदर्शनही दाखविण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक सरसावले आहेत.
जिल्ह्यातील दोनशे अठरा ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत तीस डिसेंबर होती. आता माघारीची मुदतही संपली आहे. धुळे तालुक्यातील चिंचवारसह शिंदखेडा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींची निवड बिनविरोधवर आज शिक्कामोर्तब झाले. जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी त्या - त्या विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी आमदार निधीतील रक्कमेतील काही लाखांची बक्षिसेही घोषीत केली आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्या समर्थकांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यासाठी सलग चोवीस तासांपासून बैठकांचे सत्र सुरु होते. मात्र दोन चारच पंचायती बिनविरोध झाल्या आहेत. माघारीनंतर उशिरापर्यंत उमेदवारांना चिन्ह वाटप झाले.
..त्यास्ले पंचायत बिनविरोध नकोच?
प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात काही विशेष कलंदर हस्ती आहेत. त्यांना बिनविरोध निवडणूक नकोय. त्यांच्या मते बिनविरोध निवडणूक हा लोकशाहीचा घात आहे. यावर बिनविरोधसाठी प्रयत्न करणारे सांगतात, बिनविरोध झाल्यास त्यांना मोठा फटका बसेल. त्यांचे महत्व कमी होईल. विशेष म्हणजे त्यांची मतदान होईपर्यंतच्या एन्जॉयवरही पाणी फिरेल. म्हणून ते लोकशाहीवर उपाहासात्मक जोर देतात, असे जोरदार चर्चिले जावू लागले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे