उमेदवारीसाठी जातीय समीकरणांवरच अधिक भर 

भगवान जगदाळे
Monday, 28 December 2020

प्रभागनिहाय आरक्षणानुसार कोणत्या वॉर्डात कोणत्या समाजाची किती मते आहेत, याचा अंदाज बांधून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

निजामपूर (धुळे) : साक्री तालुक्याच्या माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे या दोन्ही १७ सदस्यीय ग्रामपंचायतींच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, कोणाला नेमकी कोणत्या पॅनलकडून उमेदवारी मिळते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग करायला सुरवात केली असून, लवकरच चित्र स्पष्ट होईल. त्यासाठी गुप्त बैठकांचे सत्र सुरू आहे. 
ग्रामपंचायत निवडणूक विविध मुद्यांवर गाजणार असून, पॅनलतर्फे उमेदवारी देताना विकासाच्या मुद्यांपेक्षा धार्मिक व जातीय समीकरणांवरच अधिक भर दिला जात आहे. प्रभागनिहाय आरक्षणानुसार कोणत्या वॉर्डात कोणत्या समाजाची किती मते आहेत, याचा अंदाज बांधून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. प्रत्येक पॅनलतर्फे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता आहे. काही कार्यकर्ते आतापासूनच अपक्ष उमेदवारीच्या तयारीत आहेत. 

जैताणेत चौरंगी लढतीची शक्यता 
जैताणे ग्रामपंचायतीत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विकास, ग्रामविकास व समता विकास या तिन्ही पॅनलची एकहाती सत्ता होती. विरोधकांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. यंदा मात्र चित्र थोडे वेगळे आहे. माजी सरपंच तथा गटनेते संजय खैरनार यांच्या शहरविकास आघाडीसह सामाजिक कार्यकर्ते गोकुळ पाटील, माजी उपसरपंच तथा पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे व माजी सरपंच ईश्वर न्याहळदे यांच्या चारही पॅनलमध्ये चौरंगी सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. काही प्रभागांमध्ये पॅनलतर्फे उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होऊन अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

निजामपूरला तिरंगी लढतीची शक्यता 
निजामपूर ग्रामपंचायतीत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकता पॅनलची एकहाती सत्ता होती. यंदा निजामपूरला दोन प्रमुख पॅनलमध्ये थेट दुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. पॅनलतर्फे उमेदवारी न मिळाल्यास बहुतेक इच्छुकांनी अपक्ष उमेदवारीची तयारी केल्याने काही प्रभागांमध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते युसूफ सय्यद यांनी समविचारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतंत्र पॅनलची घोषणा केली आहे. त्यांनी सतरापैकी तीन जागांवर मुस्लिम उमेदवार, तर उर्वरित जागांवर बहुजन समाजातील इच्छुकांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप, शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह क्वालिटी सोशल ग्रुपने एकत्र येऊन प्रतिस्पर्धी पॅनलसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. 

अनेकांच्या भूमिका अद्याप गुलदस्त्यातच 
स्थानिक पातळीवर पक्षांची गणिते यशस्वी होतीलच, असे नाही. गावपातळीवर पक्षांपेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. ऐनवेळी काय वाटाघाटी होतील, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. किमान सातवीपर्यंत शिक्षणाच्या अटीसह कागदोपत्री सोपस्कारांमुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. निवडणुकीचा खर्च नेमका कोणी करायचा, हाच प्रश्न बहुतेकांना सतावतोय. त्यामुळे अनेकांची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat election ethnic equation