सरपंच आरक्षण सोडतीला महिलांची उमेदवारांचीच दांडी! 

विजयसिंग गिरासे
Monday, 1 February 2021

तालुक्यात एकूण १२३ ग्रामपंचायती असून, त्यांपैकी झोटवाडे व रहीमपुरे ग्रामपंचायती यापूर्वी २०१५-२०२० आरक्षण कायम ठेवल्याने १०८ ग्रामपंचायती व १३ गटग्रामपंचायतीसाठी २८ जानेवारीला आरक्षण काढले होते.

चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील एकूण १२१ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (ता. १) महिला आरक्षणासाठी दुपारी एकला शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली. या ६१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच राहणार आहेत. महिला सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात येणार असताना निवडुन आलेल्‍या महिला उमेदवारांचीच दांडी होती.

तालुक्यात एकूण १२३ ग्रामपंचायती असून, त्यांपैकी झोटवाडे व रहीमपुरे ग्रामपंचायती यापूर्वी २०१५-२०२० आरक्षण कायम ठेवल्याने १०८ ग्रामपंचायती व १३ गटग्रामपंचायतीसाठी २८ जानेवारीला आरक्षण काढले होते. सोमवारी आरक्षण सोडत काढण्यास तहसीलदार सुनील सैंदाणे, निवासी नायब तहसीलदार बन्सीलाल वाडिले, निवडणूक शाखेचे अव्वल कारकून संजय राणे, भूषण चौधरी, कारकून दीपक माळी आदींनी मदत केली. शिंदखेडा येथील रेहान शेख सईद या दहा वर्षांच्या लहान मुलाने चिठ्ठ्या काढल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. अनुसूचित जातीसाठी एकूण सात सरपंचपदांपैकी तीन महिलांसाठी, अनुसूचित जमातीच्या एकूण २७ पैकी १३, नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या एकूण ३३ पैकी १७ व सर्वसाधारण ५४ पैकी २८ महिलांसाठी अशा एकूण ६१ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. 

असे निघाले आरक्षण
अनुसूचित जातीच्या महिला राखीव : परसामळ, मांडळ व आरावे. अनुसूचित जमाती : वडदे, वरपाडे, डांगुर्णे-सोंडले, अमराळे, हुंबर्डे-वडली, भडणे, वाघोदे, बेटावद, गव्हाणे-शिराळे, खलाणे, विखरण, विखुर्ले व डाबली. नागरिकांचा मागास प्रवर्ग : निशाणे, सोनशेलू, बाभुळदे, पथारे, वरझडी, वाघाडी बुद्रुक, रामी, सवाई-मुकटी, अजंदे खुर्द, सतारे, नरडाणा, वणी, डोंगरगाव, निमगूळ, मालपूर, अजंदे बुद्रुक व साळवे. सर्वसाधारण : अमळथे, अंजनविहिरे, चिलाणे, चिमठाणे, दरखेडा, जखाणे, जोगशेलू, कामपूर, कर्ले, कुरूकवाडे, महाळपूर, माळीच, मंदाणे, मुडावद, नेवाडे, निरगुडी, पिंपरखेडा, सुराय, विरदेल, वाघाडी खुर्द, वालखेडा, वायपूर, झिरवे, होळ (प्र. बेटावद), मेथी, कळगाव, तावखेडा (प्र. बेटावद) व दिवी, धांदरणे, नवे कोडदे, निरगुडी, सुराय, वालखेडा, मेथी, रोहाणे, चिमठावळ, जखाणे, कुरूकवाडे, पाष्टे, टाकरखेडा, वायपूर, कळगाव, दिवी, दलवाडे (प्र. नंदुरबार), जोगशेलू, महाळपूर, पाटण, तामथरे, झिरवे, तावखेंडा (प्र. बेटावद), दरखेडा, कदाणे, माळीच, पिंपरखेडा, तावखेडा (प्र. नंदुरबार), लंघाणे व चौगाव खुर्द या ग्रामपंचायती खुल्या वर्गासाठी आहेत. 
 
बाभुळदेचे आरक्षण आता डाबलीला 
शिंदखेडा तालुक्यातील बाभुळदे येथील सरपंचपद २८ जानेवारीला अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. बाभुळदे येथील माजी सरपंच विलास शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतल्यानंतर तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी दुरुस्ती करून पूर्वी डाबली ग्रामपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होते. डाबली ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव निघाले आहे. या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचा ‘घोळ’ झाल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या तक्रारी करण्यात येणार आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat women reservation in shindkheda taluka