अचानक दोनशे लोकवस्‍तीचे गावच झाले गायब; युवकाने शाळा उभारली तिथे उरले फक्‍त लाकडी खांब

एल. बी. चौधरी
Saturday, 2 January 2021

पदवीधर युवकाने शासन, प्रशासनाशी संघर्ष करून येथे २०१५-१६ मध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू करण्यास भाग पाडले. डोंगरात गाव असल्याने प्रशासनाला शासकीय जागा उपलब्ध होत नसल्याने एकाने स्वतःची जागा दिली. ग्रामस्थांनी निधी जमवत शाळा उभी केली पण..
 

सोनगीर (धुळे) : पूर, भूकंप अशा आपत्तींनी किंवा एखाद्या प्रकल्पामुळे गाव विस्थापित होते. लोक अन्यत्र निघून जातात. गावाच्या खाणाखुणा राहतात. मात्र होळकरवाडी (ता. शिंदखेडा) हे दोनशे लोकवस्तीचे गाव मेंढ्या चराईसाठी दाहीदिशा निघून गेल्याने निमर्नुष्य झाले असून, गावाच्या केवळ खुणा राहिल्या आहेत. महिनाभरापूर्वी येथे एक लहानसे गाव होते, हे नवीन माणसाला सांगूनही पटणार नाही, अशी स्थिती आहे. अर्थात, तीन ते चार महिन्यांनंतर गावात पुन्हा लोकांचा राबता व लहानग्यांचा कलकलाट ऐकू येणार आहे. 
होळकरवाडी ही ठेलारी वस्ती असलेले गाव असून, सोंडले व डांगुर्णे गटग्रामपंचायतीच्या यादीत होळकरवाडीतील शंभराहून अधिक मतदार आहेत. अनेक वर्षांपासून होळकरवाडी अस्तित्वात असली तरी तेथे रस्ता, शुद्ध पिण्याचे पाणी, गटारी, वीज आदी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. पावसाळ्यात सोनगीरकडे येणे शक्य होत नाही. जामफळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणात होळकरवाडी पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने दोन-चार वर्षांत वाडीचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

पदवीधर युवकाने सुरू केली होती शाळा
संतोष ठेलारी या एकमेव पदवीधर युवकाने शासन, प्रशासनाशी संघर्ष करून येथे २०१५-१६ मध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू करण्यास भाग पाडले. डोंगरात गाव असल्याने प्रशासनाला शासकीय जागा उपलब्ध होत नसल्याने एकाने स्वतःची जागा दिली. ग्रामस्थांनी निधी जमवत शाळा उभी केली. सध्या येथे बावीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना पोषण आहारासाठी कच्चा मालही सोंडले येथे उतरविला जातो. तेथून बैलगाडीवर होळकरवाडीत येतो. या गावातील सर्वच कुटुंबे पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यात रवाना झाले आहेत. 

आता फक्‍त राहिले लाकडी खांब
कपडेलत्ते, भांडीकुंडी, झोपडीवरील कापडी छतासह निघून गेल्याने केवळ झोपडी उभी करण्यासाठी छोटे लाकडी खांब उभे आहेत. सध्या एकच कुटुंब राहत असून, तेच इतरांच्या उरलेल्या साहित्याची देखरेख करताना दिसते. जंगलात असे अचानक नजरेस येणारेही कोणीच रहिवासी नसलेले गाव पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news holkarwadi village of two hundred people suddenly disappeared