भारत- पाकिस्‍तान युद्धातील वीर जवानाकडून शौर्य पदके परत; काय आहे कारण वाचा सविस्‍तर 

संदाशिव भालकर
Thursday, 17 December 2020

गरीब नवाज कॉलनीतील निवृत्त सैनिक आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती करीत आहे. माजी सैनिक म्हणून देशाची व राष्ट्राची सेवा त्यांनी केली. १४ डिसेंबर १९७१ ला भारत- पाकिस्तान युद्धात ते सहभागी होते. या युद्धात चांगली कामगिरी केल्यामुळे पाच पदक तसेच एक विदेश पदक व एक संग्राम पदक त्यांना मिळालेले आहे.

दोंडाईचा (धुळे) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ माजी सैनिक युसुफ उस्मान खाटीक यांनी स्वतःकडील पदक केंद्रशासनास परत केले आहे. अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी सन्मानाने ते पदक स्वीकारले. 

‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत गुरूवारी (ता. १७) येथील युसुफ उस्मान खाटीक या निवृत्त सैनिकांनी आपल्याला मिळालेली सर्व पदके केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्याकडे स्वातंत्र्यसैनिक धनसिंग हिलाल गिरासे, नानाभाऊ पाटील, नयना प्रकाश अहिरे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, गुलाबसिंग सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष तथा रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, शिक्षण मंडळ माजी सभापती नाजिम शेख, अमित पाटील, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम राजपूत, व्हि. जी. पाटील, जितेंद्र तिरमले, आबीद शेख, दिलीप माणिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुलाब पाटील, दगडू सोनवणे, शिवाजी पाटील, भालचंद्र पाटील, वीरेंद्र गोसावी, ॲड. प्रमोद मराठे, दौलत सूर्यवंशी, रईस बागवान, न्हानजी अहिरे, प्रताप भवरे, हाजी जावेद, शकील भांड, इमरान शहा आदी उपस्थित होते. 

एकूण सात पदके
गरीब नवाज कॉलनीतील निवृत्त सैनिक आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती करीत आहे. माजी सैनिक म्हणून देशाची व राष्ट्राची सेवा त्यांनी केली. १४ डिसेंबर १९७१ ला भारत- पाकिस्तान युद्धात ते सहभागी होते. या युद्धात चांगली कामगिरी केल्यामुळे पाच पदक तसेच एक विदेश पदक व एक संग्राम पदक त्यांना मिळालेले आहे. आज हे सर्व पदक स्वखुशीने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ एक सुजान जागृत किसान या नात्याने निषेध म्हणून सन्मानाने मिळालेली सर्व पदक परत केले. 

काय म्‍हणताय स्‍वातंत्र सैनिक
कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात जर शेतकरी व शेतीला किंमत नसेल तर मला या मिळालेल्या सर्व पदकाचे आवश्यकता नाही. कारण मी एक शेतकरी पुत्र आहे. मला उर्वरित आयुष्यात उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी शेती करायची आहे. देश सेवेसाठी जसे मी देशाचे रक्षण केले त्याप्रमाणे आता देश बांधण्यासाठी आपल्या सर्वांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही पदक परत करीत आहे. शेती आणि कष्टकरी शेतकरीचे बाजारीकरण होत असल्याने हे मला मान्य नाही. माजी सैनिकांच्या व शेतकऱ्यांच्या भावना केंद्र शासनाला कळवावेत अशी विनंती युसूफ खाटीक यांनी केली आहे. 
 
खाटीक यांच्या निर्णयाचे स्‍वागत 
दोंडाईचात अनेकांनी केले खाटीक यांचे समर्थन. सेवानिवृत्त सैनिक युसुफ खाटीक यांनी केंद्र शासनाच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ स्वतः प्राप्त केलेली पदक केंद्र शासनास परत केल्याच्या निर्णयाचे डॉ. रवींद्र देशमुख युवा मंच, गुलाबसिंग सोनवणे युवामंच, अमित पाटील युवा मंच, वसुधा बहुउद्देशीय सेवा ट्रस्ट यांनी समर्थन केले. 
 
माझ्या पस्तीस वर्षाच्या सेवेत असे निवेदन स्वीकारलेले नाही. प्रथमच अशा प्रकारचे निवेदन स्वीकारीत आहे. आपल्या भावना, आग्रह निश्चित शासनापर्यंत पोचवेल. 
-सुदाम महाजन, अप्पर तहसीलदार 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news india pakistan war brave soldier medal return