esakal | शेतकऱ्यांनी जामफळ धरणाचे काम पाडले बंद; शेतजमिनींचा मोबदला मिळण्यास चालढकल  
sakal

बोलून बातमी शोधा

jamfal dam

शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मोबदला मिळाल्यास भुमिहीन झालेल्या या शेतकऱ्यांना नवीन शेती घेऊन पोट भरता येईल. म्हणून त्वरीत मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी जामफळ धरणाचे काम पाडले बंद; शेतजमिनींचा मोबदला मिळण्यास चालढकल  

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्प भरुन घेणाऱ्या योजनेत बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्‍यांना शेतजमिनीचा पुरेसा मोबदला देण्यास शासन व प्रशासन चालढकल करीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धरण क्षेत्रात जाऊन मंगळवारी (ता.२) जामफळ धरणाचे काम बंद पाडले. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौरे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र ताबडतोब मोबदला न मिळाल्यास प्रकल्पासाठी शेती देणार नाहीत, तसेच जामफळ प्रकल्पाचे काम पुढेही बंदच ठेवू, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. 

शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मोबदला मिळाल्यास भुमिहीन झालेल्या या शेतकऱ्यांना नवीन शेती घेऊन पोट भरता येईल. म्हणून त्वरीत मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान शेतीला व फळझाडांना बाजारभावाच्या चारपट दाम देण्याऐवजी उलट बाजारभावपेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक शेतकऱ्‍यांची शेती महामार्गाला लागून आहे. महामार्गालगत जमिनीच्या एकरी किमती ५० लाख ते एक कोटी रुपये आहे. तर शासन दोन ते चार लाख रुपये एकरी देत आहे. बाजारभावाप्रमाणे शेतजमिनीला पुरेसा मोबदला न मिळाल्यास शेतीतर देणार नाहीच पण बळजबरी केल्यास धरणाचे काम कायमचे बंद पाडू, असा इशारा सुलवाडे -जामफळ -कनोली उपसा सिंचन संघर्ष समितीने दिला आहे. 

वेगवेगळ्या ठिकाणी जावून केले काम बंद
शिंदखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी धरण परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुरू असलेले काम बंद पाडले. पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, दंगल धनगर, ज्ञानेश्वर चौधरी, संजय परदेशी, पराग देशमुख, लखन रुपनर, संजय येवले, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, श्याम माळी, भटू धनगर, धनंजय कासार, रवींद्र माळी आदींसह महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
दहा दिवसांची स्थगिती 
केदारेश्वर मोरे, ज्ञानेश्वर चौधरी, श्याम माळी, लखन रुपनर, पराग देशमुख आदींनी अपर जिल्हाधिकारी जगदाळे व प्रांताधिकारी विक्रम बांदल यांची भेट घेतली. येत्या दहा दिवसांत तुमचे मोबदल्याचे काम मार्गी लावतो, असे आश्वासन त्यांनी दिल्याने पुढील दहा दिवस जामफळ धरण काम बंद आंदोलन स्थगित ठेवल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष केदारेश्वर मोरे यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे