अहिराणीच्या अवीट गोडव्याने निमंत्रण..कारण आते लगीन पत्रिकाबी अहिराणीमा

marriage cardmarriage card
marriage cardmarriage card

कापडणे (धुळे) : प्रत्येक प्रांतात, राज्यात किंबहुना जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्‍यात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्त्व असते. मातृभाषेत बोलण्याची तऱ्‍हा आणि मज्याच वेगळी असते. अति प्रमाणात झालेले दुःख किंवा आनंदाचे उद्‍गार मातृभाषेतच निघतात. खानदेशातील गोडवा असलेल्या अहिराणीचा जागर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. यामुळेच खानदेशातील विवाह निमंत्रणपत्रिकाही आता अहिराणीत छापण्याची क्रेझ वाढली आहे. यामुळे अहिराणीला निश्चितच अच्छे दिन सुरू झाल्याचे बोलले जात आहे. 
खानदेशातील अहिराणी भाषेचा गोडवा अवीट आहे. बहिणाबाईंच्या काव्याने अहिराणीला अजरामर केले आहे. अहिराणी ओव्या मनाचा ठाव घेतात. आता अहिराणीत विवाह निमंत्रणपत्रिका छापण्याचे प्रमाण वाढले आहे. 

या शब्‍दांचा प्रामुख्याने वापर
या पत्रिकांमध्ये डिकरा, डिकरी, आंडेर, आंडोर, यास्न लगीन सोबन, लगीन धरेल शे, हायद, भालदेव, भाऊबन, वाडवडिलस्नी इनंतीले मान दिसन, थोपकरी, हायद, सनवार, मुराई, मुद्दा ना पावना, चिल्ला पिल्ला, ताल तपास साठे आदी शब्द वापरले आहेत. बोलताना अहिराणी वाक्प्रचार, म्हणी आणि कवितांच्या ओळी वापरून पत्रिका अधिकच रुबाबदार केली आहे. 

येण्याचा आग्रह अन्‌ सन्मानासाठी ओळी
पत्रिका वाचणारा पत्रिकेत गुरफटून राहतो. ‘आमले येवानी नयी रजा, आमना लोखंडी दरजा, तप्ते आंघोयी करज्यात, बयीण भाचीले बलावज्यात’ असे लिहून विवाहाला येण्याचा आग्रह धरला आहे, तर ‘तुना चुलता हौशीदार, तुना मामा जमादार, लयी गयात नवरदेवले मारुतीना पार’ असे म्हणत पै-पाहुण्यांचा सन्मान वाढविलेला आहे. 
 
पत्रिकेत काव्यसाधनाही 
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेने अहिराणीला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी चळवळ सुरू केली आहे. अहिराणीतील पत्रिकेने मोठे पाठबळ मिळत आहे. पत्रिकेत ‘आपुण अहिराणीले वाचाडूत, ते अहिराणी आपले वाचाडी’ असे ब्रीदवाक्यही नमूद केलेले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com