वाहतुकीच्या कोंडीत रूग्णवाहिकाही फसते; पालकमंत्री संतप्‍त..म्‍हणाले गडकरींशी चर्चा करतोच

एल. बी. चौधरी
Sunday, 7 February 2021

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना अवगत केले असता त्यांनी संतप्त भावना व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करतोच, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्‍न हाताळावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली. 
 

धुळे : येथील लळींग, सोनगीर टोल नाक्यावर वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी डोकेदुखी ठरली आहे. याप्रश्‍नी खुद्द स्थानिक नेते, अधिकारी, राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मूग गिळून आहेत. वाहतुकीच्या कोंडीत रुग्णवाहिका फसली तरी कुणालाही सोयरसुतक नाही. याबाबत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना अवगत केले असता त्यांनी संतप्त भावना व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करतोच, तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रश्‍न हाताळावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली. 
लळींग, सोनगीर टोल नाक्यावर सुटीच्या दिवसासह इतर वेळी वारंवार वाहतुकीची कोंडी होताना दिसते. मुंबई- आग्रा, नवापूर- सुरत महामार्गासह गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडकडील रोज शेकडो अवजड व इतर प्रवासी वाहने शिरपूर, लळींग, सोनगीर टोल नाक्यावरून ये- जा करतात. मात्र, वारंवार दुपारनंतर वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात होते. त्यावेळी अनेक किलोमीटर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. महिला, बालके, रुग्णवाहिका वाहतुकीच्या कोंडीत अडकतात. त्यांना मार्गस्थ होण्यासाठी मोठा विलंब लागतो. 

फुकट सुविधेमुळेही दुर्लक्ष 
टोल देऊनही सुकर प्रवास होत नसल्याने प्रवासी, वाहनचालक कमालीचे त्रस्त आहेत. त्यांची कुणीही दखल घेण्यास तयार नसल्याने ते नेते मंडळी, अधिकारी, टोल व्यवस्थापनावर रोष व्यक्त करतात. नेते मंडळी, अधिकारी, राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते टोल भरत नाही, अनेक जण फुकट सुविधा घेतात. त्यामुळे त्यांना टोल नाक्यावर वाहतुकीच्या कोंडीत रुग्णवाहिका व इतर वाहने अडकली तरी काहीही वाटत नसावे. 

वाहतूक कोंडीमागची कारणे 
संबंधित टोल नाक्यांवर दुपारी चार ते पाचच्या कालावधीत वसुली कर्मचाऱ्यांची शिफ्ट बदलते. त्यावेळी सर्व कर्मचारी सेवा बंद ठेवून निघतात. नंतर बदली कर्मचारी येतात, ते सेट होतात व पुन्हा वसुली सुरू करतात. या कालावधीत दुतर्फा शेकडो वाहने ताटकळत उभी राहतात. पर्यायाने भली मोठी रांग लागते. कॅश काउंटरची एक लेन आणि फास्ट टॅगची सुविधा असलेल्या लेन ठिकाणी व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला दिसतो. त्यात टोल नाक्यावरील कर्मचारी उद्धट वर्तणूक करतात. 

टोल नाके चुकीच्या ठिकाणी 
मुंबई- आग्रा महामार्ग व त्यावर रोज शेकडो वाहने ये- जा करत असताना एका बाजूला दहा वसुली लेन आणि दुसऱ्या बाजूलाही दहा लेनची गरज आहे. सद्यःस्थितीत प्रत्येकी पाच- पाच लेन असल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिक भर पडते. त्यावरून टोल नाके चुकीच्या ठिकाणी असल्याचे व्यवस्थापन खासगीत मान्य करतात. याविषयी अधिकारी, नेते, राजकीय संघटना बोलायला तयार नाही. 
 
पालकमंत्री गडकरींशी बोलणार 
असे प्रश्‍न दौऱ्यावर येऊन गेलेले पालकमंत्री सत्तार यांना अवगत करण्यात आले. त्यांनीही रुग्णवाहिकेसाठी एक लेन कायम मोकळी असली पाहिजे, असे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट बदलाचा विषय वाहतुकीची कोंडी निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे. याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलतो आणि प्रश्‍न सोडवतो, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी पत्रकारांना दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news lading songir toll naka ambulance in traffic minister abadul sattar