esakal | दररोज निघतेय शंभर क्‍विंटल गवार; सारेच बंद असल्‍याने विक्रीचा प्रश्‍न

बोलून बातमी शोधा

guar

शेतकरी भाजीपाला उत्पादन घेण्यात माहीर आहेत. उन्हाळ्यात कमी क्षेत्रात अधिक भाजीपाला घेतात. सध्या गवार, वांगी, टोमॅटो, गिलके, कारले व पालक हे उत्पादन निघत आहेत. यंदा गवारचे क्षेत्र अधिक प्रमाणात वाढविले आहे.

दररोज निघतेय शंभर क्‍विंटल गवार; सारेच बंद असल्‍याने विक्रीचा प्रश्‍न

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून गवारची काढणी सुरु आहे. दररोज सुमारे शंभर क्विंटलपेक्षा अधिक गवार निघत आहे. चार दिवसांपासून लॉकडाऊन सुरु झाला आहे. बाजार समित्या अनिश्चित कालावधीसाठी बंद झाल्या आहेत. शहादा, सुरत व सेंधवा येथील बाजारपेठाही बंद झाल्याने दररोज निघणारा शंभर क्विंटल भाजीपाला विकायचा कोठे? अशी भ्रांत शेतकऱ्यांना पडली आहे. प्रती किलो सत्तर असणारी गवार अचानक कोलमडली आहे. 
येथील शेतकरी भाजीपाला उत्पादन घेण्यात माहीर आहेत. उन्हाळ्यात कमी क्षेत्रात अधिक भाजीपाला घेतात. सध्या गवार, वांगी, टोमॅटो, गिलके, कारले व पालक हे उत्पादन निघत आहेत. यंदा गवारचे क्षेत्र अधिक प्रमाणात वाढविले आहे. ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गवारची लागवड केली आहे. दररोज १०० क्विंटलपेक्षा अधिक गवार निघत आहे. 

चांगला भाव होता पण
गवारसाठी शहादा व मध्य प्रदेशातील सेंधवा येथील भाजीपाला मार्केट प्रसिद्ध आहे. आठ दिवसांपूर्वी गवारला प्रति किलो ७० चा भाव मिळत होता. सत्तरच्या भावामुळे शेतकऱ्यांचे डोळे विस्फारले होते. यंदा गवारच्या उत्पादनातून अधिकचा लाभ होईल, असे वाटले होते. अशा स्थितीत अचानक लॉकडाउन लागू झाल्याने सर्व बाजारपेठा बंद झाल्या आहेत. गवारचे बाजारभाव गडगडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघणारी गवार विकायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान बाजारपेठा बंद झाल्याने गवार उत्पादक शेतकरी प्रकाश पाटील, छोटू माळी, चेतन मोरे, दादा पाटील, भरत माळी, राजेंद्र माळी, ज्ञानेश्वर माळी, दगाजी मोरे, नितीन माळी, मनोज माळी, संजय माळी आदी शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 

संपादन- राजेश सोनवणे