
महापालिकेच्या हद्दवाढीत वलवाडीचा समावेश झाला आहे. परंतु, या परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये रस्तेच नाहीत. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
धुळे : शहरातील वलवाडी भागामधील मंजूर रस्ता हरवला की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत संबंधित रहिवाशांनी आठवड्यात प्रश्न मार्गी लागला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
महापालिकेच्या हद्दवाढीत वलवाडीचा समावेश झाला आहे. परंतु, या परिसरातील अनेक कॉलन्यांमध्ये रस्तेच नाहीत. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रस्ते बळकट नसल्याने किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात तर रहिवाशांचे अधिक हाल होतात. त्यांच्यासह वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. वाहनधारकांची मोठी कसरत होते.
कार्यादेश दिला पण...
वलवाडी परिसरातील गोंदूर रोड ते बिजलीनगरपर्यंत चांगला रस्ता होण्यासाठी रहिवाशांसह तत्कालीन राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने २०१८ मध्ये मागणी रस्ता होण्यासाठी मंजुरी दिली. तसेच सप्टेंबर २०१८ ला या रस्ते कामाची ई-निविदा प्रकाशित झाली. ही प्रक्रिया पूर्ण होऊन महापालिका प्रशासनाकडून कार्यादेश दिला गेला. या रस्त्यासंबंधी निधी तत्कालीन वलवाडी ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातील होता. प्रशासकीय मान्यतेसह रस्ता मंजुरीची प्रक्रिया, निविदा, कार्यादेश, ठराव, असे सर्व सोपस्कार पूर्ण झाले. तरीही रस्त्याचे काम का सुरू झाले नाही, मंजूर रस्ता होण्यापूर्वीच हरवला की काय, अशी शंका रहिवाशांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे मंजूर रस्त्याचा निधी शिल्लक पडून आहे. यात रस्ता होऊ नये म्हणून काही विघ्नसंतोषी प्रयत्नशील तर नसावेत?, अशी शंकाही उपस्थित होत आहे.
आंदोलनाचा इशारा
महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रस्त्याचे काम आजपर्यंत झाले नाही. येत्या आठवड्यात मागणी रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर साईकृपा कॉलनी, बिजलीनगर, रामदासनगर, इंद्रप्रस्थनगर आणि प्रभाग एकमधील नागरिक महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा पी. सी. पाटील, यू. एस. पाटील, रणजित भोसले, एस. पी. महाजन, प्रवीण भालेराव, गौरव मिटकरी, अमित भामरे, उमेश काळे, हिरालाल थोरात, जी. एस. व्यवहारे, योगेश पवार, महेंद्र अहिरराव, नितीन पाटील, रवींद्र सोनवणे, अभिषेक वाघ, राजेंद्र शिसोदे, कुणाल वाघ, प्रमोद सोनजे आदींनी दिला आहे.
संपादन ः राजेश सोनवणे