कृषीच्या ग्राहकांकडे १३२० कोटी थकबाकी; धुळे जिल्ह्यातील स्थिती

रमाकांत घोडराज
Sunday, 14 February 2021

कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या व वीजबिल वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने नुकतेच महाकृषी ऊर्जा अभियान जाहीर झाले आहे. थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे हे अभियान आहे.

धुळे : जिल्ह्यातील ९९ हजार ४७२ कृषिपंप ग्राहकांकडे कृषीपंपाच्या वीजबिलापोटी तब्बल १३२० कोटींवर रकमेची थकबाकी आहे. दरम्यान, महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत थकबाकीदारांनी मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम वर्षभरात जमा केल्यास उर्वरित थकबाकीची ५० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. 
कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या व वीजबिल वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने नुकतेच महाकृषी ऊर्जा अभियान जाहीर झाले आहे. थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे हे अभियान आहे. या अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश केला आहे. या ग्राहकांच्या पाच वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ केला आहे. तसेच पाच वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकारही १०० टक्के माफ करून व्याज १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारत आहे. 

४१९ कोटी होणार माफ
धुळे जिल्ह्यातील ९९ हजार ४७२ कृषिपंप ग्राहकांकडे सद्यःस्थितीत तब्बल १३२० कोटी ६७ लाख रुपये थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण ४८२ कोटी ४२ लाख रुपये महावितरणकडून माफ झाले आहेत. कृषी ग्राहकांनी उर्वरित ८३८ कोटी २५ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम वर्षभरात अदा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के अर्थात ४१९ कोटी १२ लाख रुपये माफ होणार आहे. 

सवलतीचे टप्पे असे 
ज्या ग्राहकांनी अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांना त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के व तिसऱ्या वर्षी २० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणेही गरजेचे असल्याचे महावितरणने म्हटले आहे. 

६६ टक्के रक्कम सक्षमीकरणावर 
शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्तीची संधी तसेच वसूल झालेल्या बिलातील ६६ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे. यात ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे. 
 
पोर्टलवर तपशील उपलब्ध 
कृषिपंप ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाच्या रकमेचा तपशील https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक टाकल्यावर तपशील उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी महावितरणच्या संबंधित कार्यालयात संपर्क साधावा व वीजबिल थकबाकीमुक्तीच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news mahavitaran agree panding bill farmer not responce