महिला सक्षमीकरणाची योजना; कर्ज देण्याच्या बहाण्याने लाखोचा गंडा

विजयसिंग गिरासे
Tuesday, 29 December 2020

बचतगटातून तुम्हाला कर्ज मिळवून देण्यासाठी गळ घातली. बचतगटाच्या सदस्य झाल्यावर तुम्हाला बँकेतून कर्ज दिले जाईल.

चिमठाणे (धुळे) : महिला सक्षमीकरणासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र, या योजनेचा गैरफायदा घेत महिलांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकरण शिंदखेडा तालुक्यात उघडकीस आले आहे. महिला बचतगटाच्या नावाखाली कर्ज मंजूर करून देण्याची बतावणी करत महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शिंदखेडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. 
धुळे येथील आरसीटी कार्यालयाने बचतगटातील महिलांसाठी पिशवी उद्योग प्रशिक्षण अमळथे येथे आयोजित केले होते. विजय देवरे (रा. धुळे), राजेंद्र निळकंठ पाटील व मनीषा गोपाळ पाटील (दोघेही रा. चिमठाणे) यांनी महिला बचतगटातून तुम्हाला कर्ज मिळवून देण्यासाठी गळ घातली. बचतगटाच्या सदस्य झाल्यावर तुम्हाला बँकेतून कर्ज दिले जाईल. तसेच कर्ज मंजूर न झाल्यास पैसे परत केले जातील, अशी बतावणी तिघांनी केली. 

एका फाईलीसाठी चाळीस हजार
संशयितांनी तक्रारदार महिलेला कर्ज मंजूर करण्यासाठी कागदपत्रे गोळा करावयास लावले. तसेच एक फाइल पुढे पाठविण्यासाठी ४० हजार रुपये, तर दोन फाइलींसाठी ८० हजार घेतले होते. कागदपत्रांची सर्व फाइल तसेच दोघे फाइलचे ८० हजार रुपये देऊन महिना उलटल्यावरही ते लक्ष देण्यास तयार नव्हते. १५ दिवसांत कर्ज काढून दिले जाईल, पुढच्या १५ दिवसांत काढून दिले जाईल, असे सांगून वेळ मारून नेली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने शिंदखेडा पोलिसांत फिर्याद दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news mahila bachatgat under the pretext of lending