आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर

महेंद्र खोंडे
Sunday, 21 February 2021

भारतीय संस्कृतीत आम्रवृक्षाचे महत्त्व फार पूर्वीपासून आहे. कोकिळेला आवडतं गाणी गाण्यासाठी परावृत्त करणारे आश्रयस्थान, वैशाखाच्या तळपणाऱ्या उन्हापासून माणसासह विविध पशुपक्ष्यांना मायेची सावली देणारे झाड म्हणून आंब्याच्या वृक्षाकडे पाहिले जाते.

तऱ्हाडी (धुळे) : कधी काळी राजाश्रय लाभलेली, सदैव प्रतिष्ठेचं प्रतीक असलेली आमराया सध्या अखेरची घटका मोजत असून, त्यांचे जतन न झाल्यास आमराईचा अनमोल ठेवा येणाऱ्या पिढीस पाहावयासही मिळणार नाही. शिरपूर तालुक्यात बोटावर मोजण्या एवढ्याच आमराई शिल्लक राहिल्या असून, मोडकळीस आलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडांची लागवड होणे आवश्यक आहे. परंतु अलिकडे आंब्याची झाडे सर्रास तोडली जात असल्याने गावागावातील आमराई नामशेष होत चालल्या आहेत.

भारतीय संस्कृतीत आम्रवृक्षाचे महत्त्व फार पूर्वीपासून आहे. कोकिळेला आवडतं गाणी गाण्यासाठी परावृत्त करणारे आश्रयस्थान, वैशाखाच्या तळपणाऱ्या उन्हापासून माणसासह विविध पशुपक्ष्यांना मायेची सावली देणारे झाड म्हणून आंब्याच्या वृक्षाकडे पाहिले जाते. आपल्या पूर्वजांनी लावलेल्या अनेक आंब्यांची जाती आजही आपण चाखत आहोत. आमराईच्या रूपात येणाऱ्या पिढय़ांसाठी लावलेली असंख्य झाडे म्हणजे त्यांचा दूरदर्शीपणाच.

शेती अन्‌ आमराईचा संबंध
पूर्वी आमराई म्हणजे प्रतिष्ठा समजली जायची. शेतीचा उल्लेख आला की, आमराईविषयी आवर्जून उल्लेख व्हायचा. शेतात किंवा बांधावर तसेच विहिरीजवळ गोलाकार किंवा रांगेत आंब्यांची झाडे असायची. या आंब्यांच्या चवीतही वैविध्य असायचे. आंब्याचे झाड इतर झाडापेक्षा उंच, विस्ताराने मोठे असते. उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसासाठीही याचा फायदा होतो. हवेने वादळाने हे झाडे पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो.

आंब्‍याचे झाड तोडण्यास परवानगी नको
अज्ञानी, निरक्षर शेतकऱ्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून आंब्याच्या अमरायाच मुळापासून तोडून नष्ट करीत आहेत. आज शासन गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे झाडे लावण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करीत आहे व निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाकडून दलालांना आंब्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी देत असल्याची खंत नागरिक बोलून दाखवित आहेत. परंतु आजमात्र 75 ते 100 वर्षांपूर्वी लावलेल्या आमराया नामशेष झाल्या आहेत. काही झाडे माणसाने चालविलेल्या धारधार करवतीने बळी गेले तर काही झाडे निसर्गाच्या रौद्र रूपाच्या कचाटय़ात सापडली.

लागवड कमी तोडणीच जास्‍त
आंबा लागवड मोठ्या प्रमाणात होत असली तरीही अधिक वजनाच्या सारख्या चवींच्या झाडांची आणि कमी उंची असलेल्या झाडांची संख्या वाढत आहे. आमराईचे सौंदर्य व आमराईशी जोडली गेलेली आत्मीयता संपुष्टात येत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. झाडांची फळधारणा कमी झाली की, झाडांची अक्षरश: कत्तल होते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच आज गावरान आंबा चाखायला तर नाहीच, परंतु पाहायलासुद्धा मिळेनासा झाला आहे. अलिकडे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या फळाचा राजा आंब्याची होत असलेली कत्तल थांबवून तोडणाऱ्यावर व तोडण्याची परवानगी देणाऱ्या विभागावर कारवाई का होऊ नये. वृक्ष तोडलेच तर त्याच जागेवर नवीन आंब्याचे झाडे लावण्याची सक्ती का करू नये, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत

पुर्वी आंब्याच्या आकार, चवीनुसार ठेवली जायची नावे...
आकारानुसार नावे असायची गोड चवीचा साखरी, खोबऱ्याच्या चवीचा खोबऱ्या, बेलाच्या चवीचा बेल्या ,शेपूच्या चवीचा शेप्या ,रंगाने शेंदरी असणारा शेंदऱ्या, चवीने आंबट असलेला आमटी, लग्नातील पिठीसारखा रसाळ पिठी, अशा अनेक जातींची आमराईत रेलचेल असायची.पुर्वी आपल्या पूर्वजांनी आंब्याच्या आकार व चविनुसार आंब्याच्या झाडाला नावे दिलेलि आसायचि उन्हाळ्यात या आमराया मध्ये अनेक रसाच्या पंगती उठायच्या असेहि वयोवृद्ध म्हातारी माणसे सांगतात.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news mango tree cutting and loss envorment