
ठेकेदारासह मुक्त हस्ते बील अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक जागरुक गाव अशी ओळख कापडणेची आहे.
कापडणे (धुळे) : येथील शेती शिवारातील चार बंधार्यांचे खोलीकरण विनाच वीस लाखावर बिल अदा झाले आहे. आता या कामाची स्पॉट पाहणी चौकशी सुरु झाली आहे. संबंधित ठेकेदारासह मुक्त हस्ते बील अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक जागरुक गाव अशी ओळख कापडणेची आहे. येथेच अशी अवस्था असेल तर जिल्ह्यात किती बोगस कामे होत असतील. या कामाची चौकशी होवून कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
खोलीकरण झालेच नाही
येथील भात नदी, भारा नाला व दुधई नाल्यावरील चार बंधार्याचे खोलीकरण एक वर्षांपूर्वी मंजूर झाले. काम सुरु करण्याचा नारळही फुटला नाही. त्यानंतर कागदोपत्री काम पुर्ण दाखवित वीस लाखापेक्षा अधिक रक्कम हडप झाली आहे. ही बाब लक्षात येताच येथील शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.
चौकशी समितीकडून स्पॉट पंचनामे
चारही बंधाऱ्यांचे शाखा अभियंता के. डी. देवरे व उपअभियंता हितेश भटूरकर (शिरपूर) यांनी स्पॉट पंचनामे केलेत. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य नवल पाटील, माजी सरपंच भटू पाटील, माजी उपसरपंच मनोज पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रशांत पाटील, ज्ञानदीप पाटील, बिल्लू पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
कापडणेसारख्या अती जागरूक गावात न झालेल्या कामाची रक्कम हडप होत आहे. इतर गावांमध्ये न झालेल्या कामांची संख्या शेकड्यावर असेल. तेव्हा सखोल चौकशी व्हावी. दोषींकडून वसुलीसह त्यांचे निलंबन व्हायला हवे.
- नवल पाटील, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती
संपादन ः राजेश सोनवणे