esakal | आता रस्ते खोदणे बंद करा; रस्ते दुरुस्तीप्रश्‍नी आमदार शाहंची तीव्र नाराजी 
sakal

बोलून बातमी शोधा

mla farukh shah

केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत शहरातील देवपूर भागात साधारण दीडशे कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते खोदण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

आता रस्ते खोदणे बंद करा; रस्ते दुरुस्तीप्रश्‍नी आमदार शाहंची तीव्र नाराजी 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : भुयारी गटार योजनेसाठी शहरातील देवपूर भागात रस्ते खोदल्याने झालेली दुरवस्था व दुरुस्तीसाठी होत असलेला प्रचंड विलंब यामुळे नागरिक वैतागल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले. रस्त्यांच्या याच विषयावर आमदार फारूक शाह यांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत रस्ते खोदणे आता बंद करा, महिन्याभरात रस्त्यांचे काम पूर्ण करा, असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला. 
केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत शहरातील देवपूर भागात साधारण दीडशे कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते खोदण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरुस्ती लवकर होत नसल्याने देवपूर भागातील नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, आमदार फारूक शाह यांनी शुक्रवारी (ता. १५) या प्रश्‍नावर महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठेकेदार यांच्यासह दत्तमंदिर, वाडीभोकर रोड, जयहिंद महाविद्यालय परिसरात पाहणी केली. महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता एन. के. बागूल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. धोत्रे, आर. टी. जगताप तसेच योजनेचे ठेकेदार एन. पी. पटेल कंपनीचे हितेश पटेल, योगेश पाटील आदी उपस्थित होते. रस्ते दुरुस्तीप्रश्‍नी यंत्रणेच्या वेळकाढूपणाबद्दल आमदार शाह यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

महिन्याभरात रस्ते पूर्ण करा 
रस्त्यांच्या दुरवस्थेप्रश्‍नी नागरिकांच्या भावना समजून घ्या व आता रस्ते खोदणे बंद करा. महिनाभरात खोदलेल्या रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण करा, मगच उर्वरित काम करा, असे आदेश आमदार शाह यांनी अधिकारी, ठेकेदाराला दिले. 

सिग्नलही सुरू करा 
शहरातील दत्तमंदिर, चाळीसगाव चौफुली, कमलाबाई शाळा चौक, कराचीवाला खुंट, प्रकाश थिएटर व इतर ठिकाणी नवीन डिजिटल सिग्नल यंत्रणा सुरू करा, असा आदेशही महापालिका विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. बागूल यांना दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे