लळींग घाटात फिरतोय बिबट्या..सोशल मिडीयावरील व्हायरल पोस्‍टचे सत्‍य

जगन्नाथ पाटील
Monday, 11 January 2021

सोशल मिडीयावर बऱ्याचशा गोष्‍टी सत्‍य असतात. परंतु, अनेकजण खोडसाळपणा करत कुठला फोटो कुठे जोडून व्हायरल करत असतात. यामुळे नागरीकांमध्ये घबराट पसरत असते. अशाच प्रकारचा खोडसाळपणा मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग घाटासंदर्भात करण्यात आला आहे.

कापडणे (धुळे) : मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग घाटात कोणत्याही प्रकारचा अपघात घडलेला नाही. बिबट्याही फिरकलेला नाही. अपघातग्रस्त दुचाकी आणि बिबट्याचे फोटो हे खोडसाळपणे व्हायरल होत आहेत. परिसरातील ग्रामस्थांनी घाबरुन जावू नये, दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवावेत, असे आवाहन मोहाडी पोलिस ठाण्याने केले आहे. 
धुळे शहरापासून जवळच असलेल्या लळींग घाटात दुचाकींचा अपघात झालेले छायाचित्र आणि त्यास कारणीभूत ठरलेला बिबट्या अशी पोस्ट बनवून रविवारी (ता.१०) मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल झाली. यामुळे लळींगसह परीसरातील ग्रामस्थांच्या दैनंदिन व्यवहारावर परीणाम झाला. एक अनामिक भिती आबालवृध्दांमध्ये पसरली. 

मग झाली शोधमोहिम सुरू
सोशल मिडीयावर दिवसभर व्हायरल झालेल्‍या पोस्‍टसंदर्भात शोधमोहिम सुरू करण्यात आली. मोहाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु, पीएसआय मुस्तफा मिर्झा, प्रभाकर ब्राह्मणे, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, धिरज गवते यांनी घटनास्थळी भेट दिली. कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे लक्षात आले. त्यानंतर लळींग येथे पोलिस कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले. आता सोशल मिडियावर खोडसाळपणा करणाऱ्याला शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news mumbai aagra highway leopards roaming in laling ghat