esakal | राष्ट्रवादी भवानत गटबाजीचे प्रदर्शन; पक्षीय फलकावरून वादावादी
sakal

बोलून बातमी शोधा

dhule ncp

राष्ट्रवादी भवानत गटबाजीचे प्रदर्शन; पक्षीय फलकावरून वादावादी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या आढावा बैठकीत फलकावरून अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन झाले. राष्ट्रवादी (Dhule NCP) भवनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आल्याने अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब (Javed Habib, NCP State Working President, Minorities Department) यांना हस्तक्षेप करावा लागला. काही कार्यकर्त्यांनी फलकावर वरिष्ठांचे छायाचित्र नसल्याने संताप व्यक्त करत फलकांची फेकाफेकी केली. (dhule-news-ncp-javed-habib-meet-and-banner-photo-issue-and-dhule-ncp-two-gat)

हेही वाचा: पदभार घेण्यावरून अक्कलकुवा ग्रामपंचायती संरपच, बिडीओत वाद

संघटनात्मक बांधणीसाठी प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब धुळे दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, भाईसहाब अल्लाउद्दीन, माजी नगराध्यक्ष नवाब बेग मिर्झा, सुमीत पवार, महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, धुळे तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, राजेंद्र चौधरी, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष जमीर शेख, शकीला बक्ष, समीर बागवान, सलीम लंबू, वसीम बारी, वसीम मंत्री आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फलकावर आक्षेप

बैठकीच्या सुरवातीलाच अल्पसंख्याक विभागाच्या काही कार्यकर्त्यांनी मंचावर लावलेल्या फलकावर आक्षेप घेतला. फलकात काही नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोटो नसल्याने ज्येष्ठ नेत्यांना किंमत देत नाहीत, असा आरोप करत शहराध्यक्ष जमीर शेख यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे जमीर शेख आणि समर्थकांत बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांमधील गटबाजीतून वाद झाल्याने बैठकीला उपस्थित मंडळी अवाक झाली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात आजपासून १८ वर्षावरील युवकांना लस

शहराध्यक्ष जमीर शेख यांनी आपला कार्यक्रम उधळून लावण्यासाठीच कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करत बैठकीतून काढता पाय घेतला. सरचिटणीस सलीम लंबू यांनी जमीर शेख यांची समजूत काढून त्यांना भवनात आणले. प्रदेश कार्याध्यक्ष हबीब यांनीही शेख यांची समजूत काढत त्यांना व्यासपीठावर बसविले.

हबीब यांची मिश्‍किली व सूचना

अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक घेण्यासाठी मी नागपूरहून धुळ्याला आलो. मात्र, येथे तर दुल्हाच रुसला आहे. ‘दुल्हे की जबरदस्ती शादी कराई जा जरी है, उसे घोडे पे बिठाया जा रहा है’, अशी मिश्किली करत प्रदेश कार्याध्यक्ष हबीब यांनी पक्षसंघटनवाढीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकदिलाने काम करावे. शहराध्यक्षांनी वर्षभरात केलेल्या कामाचा अहवाल द्यावा. संघटनात्मक वाढीसाठी कोणते उपक्रम राबविले, यासंबंधी माहिती द्यावी, अशी सूचना केली.

loading image