राष्‍ट्रवादीने दाखविले राज्‍यपाल कोश्‍यारींना काळे झेंडे

रमाकांत घोडराज
Thursday, 4 February 2021

राज्यपाल कोश्‍यारी हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखेच वावरतात. त्यांना कंगणा राणावतला भेटण्यासाठी वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाला भेटण्यास राज्यपाल कोश्‍यारी तयार नाहीत

धुळे : राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांना काळे झेंडे दाखविणार असा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काहीअंशी यश आल्याचे पाहायला मिळाले. खबरदारी म्हणून काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले खरे पण अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलीसांनाही गुंगारा देत राज्यपालांचा ताफा जात असताना काळे झेंडे दाखविल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. 

राज्यपाल कोश्‍यारी हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखेच वावरतात. त्यांना कंगणा राणावतला भेटण्यासाठी वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाला भेटण्यास राज्यपाल कोश्‍यारी तयार नाहीत असे म्हणत राज्यपालांच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी धुळे दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, महेंद्र शिरसाट, जमीर शेख, प्रकाश जाधव, मनोज कोळेकर, सरोज कदम, तरुणा पाटील यांच्यासह इतर काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून ताब्यात घेतले होते. 

अन्‌ कार्यकर्ते काळे झेंडे घेवून आले
दरम्यान, महापालिकेतील कार्यक्रम संपल्यानंतर राज्यपाल कोश्‍यारी यांचा ताफा जात असताना गरुड कॉम्ल्पेक्स परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते अचानक बाहेर आले व त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखविले. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पवार, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक मराठे व इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news ncps black flag governor koshshari van