पक्ष रस्त्यावर असावा कार्यालयात नव्हे : जयंत पाटील

धनंजय सोनवणे
Thursday, 11 February 2021

पक्ष वाढवायचा असेल तर कार्यालयात बसून नव्हे, तर लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करत संघटना वाढवावी लागेल तशी प्रत्येकाने तयारी ठेवावी,

साक्री (धुळे) : उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळवून द्यायचे असेल, तर गावपातळीपर्यंत पक्ष बळकट करावा लागेल. यासाठी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने मोठी मेहनत घेण्याची गरज आहे. गावागावांत संघटना उभी करा, पक्षाचा चेहरा आक्रमक ठेवा. भाजपला विरोध हा राष्ट्रवादीचाच असेल, असे चित्र निर्माण करा. पक्ष वाढवायचा असेल तर कार्यालयात बसून नव्हे, तर लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करत संघटना वाढवावी लागेल तशी प्रत्येकाने तयारी ठेवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांनी केले. 
येथील बालआनंद नगरी येथे आयोजित पक्षाच्या परिवार संवाद मेळाव्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. महिला आघाडीच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी आमदार अनिल गोटे, निरीक्षक अर्जुन टिळे, प्रदेश चिटणीस सुरेश सोनवणे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सुनील नेरकर, पंचायत समिती उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, ॲड. शरद भामरे, नितीन बेडसे, जितेंद्र मराठे, प्रा. नरेंद्र तोरवणे, डॉ. दिलीप चोरडिया, प्राजक्ता देसले, कल्पेश सोनवणे, अक्षय सोनवणे, सतीश पगार आदी उपस्थित होते. 
जयंत पाटील यांनी पक्ष संघटनावाढीवरच विशेष मार्गदर्शन केले. प्रत्येक आघाडीच्या प्रमुखाशी आजवरच्या कामांविषयी चर्चा केली. यात पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी काहीशी नाराजी देखील व्यक्त केली. महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. 

पांझरा कानबाबत मंत्री पाटील सकारात्मक 
दरम्यान, जयंत पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत मंत्री पाटील हे सकारात्मक दिसून आले. मात्र राज्य पातळीवरच्या विविध अडचणी लक्षात घेऊनच यातून मार्ग काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सोबतच तालुक्यातील जलसिंचन विभागाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करून मार्ग काढू अशी ग्वाही त्यांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news ncps sanvad melava minister jayant patil meet