हृदयद्रावक..पत्‍नी विहिरीत पडली; तिला वाचविण्यासाठी पतीने मारली उडी आणि आयुष्‍यच संपले

भगवान जगदाळे
Thursday, 7 January 2021

दोघांचा काही महिन्यापुर्वीच विवाह झालेला होता. स्‍वतःची शेती असल्‍याने पती- पत्‍नी रब्‍बी हंगामाचे काम आवरत होते. या दोघे पती- पत्‍नीसाठी आजचा दिवस काळ घेवून आला होता. संसार फुलण्यापुर्वीच त्‍यांचे आयुष्‍यच संपले.

निजामपूर (धुळे) : शेतात काम करण्यासाठी पती- पत्‍नी गेले होते. पतीला पिण्यासाठी पाणी हवे होते. म्‍हणून पत्‍नी शेतातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेली आणि तिचा पाय घसरल्याने ती खाली पडली. पत्‍नीची आरोळी ऐकून पतीने धाव घेत काहीही न पाहता पत्‍नीला वाचविण्यासाठी त्‍याने विहिरीत उडी मारली. यात दोघांचाही मृत्‍यू झाल्‍याची हृदयद्रावक घटना घडली.

माळमाथा परिसरातील बळसाणे (ता. साक्री) येथील नवविवाहित जोडप्याचा गावशिवारातील विहिरीत बुडून मृत्यू झाला. लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय २७) व अंजुबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. लक्ष्मण रत्‍नपारखे यांचा शेती व्यवसाय असल्‍याने सकाळी उठल्‍यावर शेतात कामासाठी जात होते. नेहमीप्रमाणे लक्ष्मण आणि त्‍यांची पत्नी अंजूबाई हे दोघेजण शेतात काम करण्यासाठी गेले होते. 

पतीला पाणी देण्यापुर्वीच..
दरम्यान पती लक्ष्मण यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पत्नी अंजूबाई या विहिरीवर गेल्या. पाणी काढत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. हे पहाताच लक्ष्मण यांनी पत्नी अंजूला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. परंतु, विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघेही जण तळाला गेल्याने नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली. नातेवाईक व ग्रामस्थांनी रात्री दहाच्या सुमारास खाजगी वाहनाने मृतदेह जैताणे आरोग्य केंद्रात दाखल केले.

दोघांची सोबतच अंत्‍ययात्रा
मृत जोडपे त्यांच्या बळसाणे शिवारातील मालकीच्या विहिरीत बुडाल्याच्या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.  वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. पती- पत्‍नीची अंत्‍ययात्रा सोबतच काढत सायंकाळी अत्यंत शोकाकूल वातावरणात बळसाणे येथे अंत्यसंस्कार झाले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news nijampur husband and wife death farm well