esakal | धुळे जुन्या सिव्हिलमध्ये प्रसूती विभाग; महिनाभरात शस्‍त्रक्रिया 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule civil hospital

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गोरगरीब महिलांना सोनोग्राफीसह प्रसूतीसाठी जावे लागते. त्यासाठी १५० ते २०० रुपये रिक्षाभाडे लागते.

धुळे जुन्या सिव्हिलमध्ये प्रसूती विभाग; महिनाभरात शस्‍त्रक्रिया 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर प्रसूती, बालरोग विभाग सुरू करावा, या मागणीसाठी समाजवादी पक्षाने सोमवारी (ता. २८) निदर्शने केली. दरम्यान, येथे प्रसूती विभाग सुरू झाला असून, येत्या महिनाभरात प्रसूती शस्त्रक्रियाही सुरू होतील, असे लेखी पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी आंदोलनकर्त्यांना दिले. 
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे गोरगरीब महिलांना सोनोग्राफीसह प्रसूतीसाठी जावे लागते. त्यासाठी १५० ते २०० रुपये रिक्षाभाडे लागते. वास्तविक, शहरातील जुन्या सिव्हिलमध्ये २०० बेडची मंजुरी मिळाली असून, १०० बेड सुरू करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे मंजुरी दिल्याप्रमाणे विभाग सुरू करावेत. येत्या १५ दिवसांच्या आत प्रसूती व बालरोग विभाग सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देत समाजवादी पक्षाने जुन्या सिव्हिलमध्ये निदर्शने केली. समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमिन पटेल, आसिफ मन्सुरी, रफीक शाह, इनाम सिद्धीकी, अकील शाह, डॉ. सरफराज अन्सारी, गुड्डू काकर, अकील अन्सारी, जमील मन्सुरी, कल्पना गंगवार, इरफान शाह, साजिद अन्सारी, रशीद शाह, आसिफ शेख आदींचा यात सहभाग होता. 

विभाग सुरू झाल्याची माहिती 
आंदोलनकर्त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी, जुन्या सिव्हिलमध्ये प्रसूती विभाग सुरू झाला असून, येत्या महिनाभरात प्रसूती शस्त्रक्रियांची व्यवस्थाही कार्यान्वित होईल, असे पत्रच दिले. जुन्या सिव्हिलमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर होते. त्यामुळे नॉन-कोविड रुग्ण दाखल नव्हते. ऑपरेशन थिएटर व आनुषंगिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर प्रसूती शस्त्रक्रिया विभागही सुरू होईल. तसेच विशेषज्ञ, डॉक्टर्स उपलब्ध असून, संबंधित सेवाही सुरू होतील, असे डॉ. सांगळे यांनी पत्रात म्हटले आहे. जुन्या सिव्हिलमध्ये उपचार सेवा सुरू करावी, यासाठी नगरसेवक पटेल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठांमार्फत आरोग्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता.  

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image