esakal | अधिकारी बदलताच पोलिस ठाण्याचा ‘मेकओव्हर’
sakal

बोलून बातमी शोधा

sakri police station

गेल्या काही वर्षांपासून साक्री पोलिस ठाण्याला काहीशी मरगळ आल्याचे चित्र दिसून येत होते. यात अवैध व्यवसायांवरील मोठ्या कारवाई थंडावल्या होत्या. गुन्हेगारांवर वचक देखील कमी झाल्याचे दिसून येत होते.

अधिकारी बदलताच पोलिस ठाण्याचा ‘मेकओव्हर’

sakal_logo
By
धनंजय सोनवणे

साक्री (धुळे) : गुन्हेगारांवर कमी झालेला वचक, यासोबतच पोलीस ठाण्याच्या परिसरात दिसून येणारी अस्वच्छता यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काहीशी मरगळ आलेल्या येथील पोलीस ठाण्याचा मेकओव्हर होत असल्याचे दिसून येत आहे. यात अंतर्गत शिस्त व गुन्हे नियंत्रणासोबतच बाह्य स्वच्छता आणि सुशोभीकरणामुळे पोलीस ठाण्याचा मेकओव्हर होत असल्याचे दिसून येते आहे.

गेल्या काही वर्षांपासून साक्री पोलिस ठाण्याला काहीशी मरगळ आल्याचे चित्र दिसून येत होते. यात अवैध व्यवसायांवरील मोठ्या कारवाई थंडावल्या होत्या. गुन्हेगारांवर वचक देखील कमी झाल्याचे दिसून येत होते. अनेक गावांमध्ये गावगुंडाची दहशत वाढायला लागली होती. यात भर म्हणजे सर्वसामान्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने सर्वसामान्यांमध्ये पोलिसांबाबतचे मत देखील बदलायला लागले होते. हे एकीकडे होत असताना पोलीस ठाण्याच्या परिसरात देखील चैतन्य राहिले नव्हते. अस्ताव्यस्त उभे केलेली वाहने, सर्वत्र दिसून येणारी अस्वच्छता, वाढलेली काटेरी झुडपे, दर्शनी भागातच अस्ताव्यस्त पडलेली अपघाग्रस्त वाहने यामुळे हा परिसर अतिशय खराब दिसत होता.

मेकओव्हरने रूप बदलणार
काही महिन्यातील हे चित्र मात्र आता बदलताना दिसून येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर मेहनत घेत असल्याचे दिसतेय. यात मागील महिनाभरात अवैध दारू, जुगार, सट्टा पेढ्यावरील धाडसत्राने गुन्हेगारीवर वचक मिळवण्याचा प्रयत्न होत असताना पोलीस ठाण्यातील कामकाजात देखील सुसत्रता आणण्याचा प्रयत्न होतो आहे. सर्वसामान्यांच्या तक्रारीकडे देखील पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने लक्ष देण्यात येत असून, हे करत असतानाच पोलीस ठाण्याच्या परिसराच्या सुशोभीकरणाकडे देखील त्यांनी लक्ष दिले आहे. पोलीस ठाण्याला रंगरंगोटी करतानाच परिसरातील अस्वच्छता दूर केली आहे. समोरच्या परिसरात भिंतीलगत बाग फुलवत परिसर प्रफुल्लीत करणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली असून, येणाऱ्याना बसण्यासाठी बाकडे बसवण्यात आले आहेत. ठिकठिकाणी कचराकुंड्या देखील ठेवण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त वाहन देखील एक भिंतीलगत ठेवण्यात आले असून, या सर्वामुळे परिसरात एक वेगळी प्रसन्नता आल्याचे दिसून येतेय.


पोलीस ठाण्याचे रूप बदलत असताना कारभार देखील पारदर्शक व लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होतो आहे. पोलिसांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये भिती न राहता स्नेहाचे वातावरण असावे यासाठी प्रयत्नशील आहे. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कामकाजात बदल आणत असतानाच बाह्य परिसर देखील चांगला व प्रसन्न दिसावा याकडे विशेष लक्ष दिले आहे.
- दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक, साक्री

ःसंपादन ः राजेश सोनवणे
 

loading image