अवकाश भरारीत धुळ्यातील दोन चिमुकले; ७ फेब्रुवारीला जागतिक विक्रमासाठी सज्‍ज

निखील सुर्यवंशी
Sunday, 17 January 2021

. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडियातर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ अंतर्गत ९०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात सरासरी ३५ हजार ते ३८ हजार मीटरपर्यंत प्रक्षेपित केले जाणार आहेत.

धुळे : रामेश्‍वरम येथून सात फेब्रुवारीला एकाचवेळी शंभर उपग्रह प्रक्षेपित केले जातील. या प्रक्रियेत जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. या निवडीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडियातर्फे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज २०२१ अंतर्गत ९०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलूनद्वारे अवकाशात सरासरी ३५ हजार ते ३८ हजार मीटरपर्यंत प्रक्षेपित केले जाणार आहेत. जगात सर्वांत कमी वजनाचे २५ ग्रॅम ते ८० ग्रॅमपर्यंतचे उपग्रह असतील. या प्रक्रियेत फाउंडेशनकडून देशातून हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रत्येकी ९० विद्यार्थ्यांच्या गटामार्फत एका उपग्रहाची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पाच दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले. प्रत्यक्ष उपग्रह बांधणी ही विद्यार्थ्यांमार्फतच केली जाईल. त्यासाठी महाराष्ट्रातून ३६० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना पुणे आणि नागपूर येथे प्रत्यक्ष उपग्रह बांधणीचे कलाम फाउंडेशनतर्फे झालेल्या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. 
 
धर्मिन गुजरातीची भरारी 
उपग्रह प्रक्षेपणातील विद्यार्थ्यांना जागतिक, एशिया, इंडिया विक्रम, अशी तीन स्वतंत्र प्रमाणपत्रे देण्यात येतील. यात येथील चावरा पब्लिक स्कूलचा आठवीचा विद्यार्थी धर्मिन गुजराथी सहभागी असेल. तो औरंगाबाद खंडपीठातील सरकारी अभियोक्ता ॲड. यतीश गुजराथी, ॲड. सारंगी गुजराथी यांचा मुलगा आहे. धर्मिन आंतरराष्ट्रीय अॅबॅकसच्या स्पर्धेत ९७ देशांतील विद्यार्थ्यांमध्ये तिसरा क्रमांक, अनेक शिष्यवृत्ती परीक्षा, होमी भाभा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्याला ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. जी. व्ही. गुजराथी आणि विधानसभेचे 
माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांचा समर्थ वारसा लाभला आहे. धर्मिनला चावरा स्कूलचे मुख्याध्यापक फादर शिजन थॉमस यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
यश भदाणेची भरारी 
शिरपूर येथील आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी यश दिगंबर भदाणे याचाही उपग्रह प्रक्षेपणात सहभाग असेल. शालेय जीवनात संशोधनाची आवड, स्पेस टेक्नॉलॉजीची जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात या तंत्रविकासात विद्यार्थ्यांचे योगदान असावे यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news satellite launch project two child selection