शाळांमधीला किलबिलाट पुन्हा सुरू; पालकांचे संमतीपत्र नाहीच

निखील सुर्यवंशी
Wednesday, 27 January 2021

कोरोनाच्या संकटामुळे सर्व शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली होती. उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे आपल्या शाळेतील नवीन वर्गही पाहता आलेला नाही. गेले आठ-नऊ महिने ते ऑनलाइन शिक्षण घेऊन परीक्षा देत आहेत.

धुळे : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमधील पाचवी ते आठवीचे वर्ग आज (ता.२७) पासून अखेर सुरू झाल्या. महापालिका क्षेत्रातील १४९ पैकी १३५ शाळा आज उघडल्या. या शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांपैकी पालकांनी संमतिपत्र दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी मोठ्या गॅपनंतर शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 
कोरोनाच्या संकटामुळे सर्व शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली होती. उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे आपल्या शाळेतील नवीन वर्गही पाहता आलेला नाही. गेले आठ-नऊ महिने ते ऑनलाइन शिक्षण घेऊन परीक्षा देत आहेत. दरम्यान, नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर खालचे वर्ग कधी सुरू होतील याची प्रतीक्षा होती. शासनाने आज (ता.२७) पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर हे वर्गही आजपासून सुरू झाले. 

१३५ शाळा उघडल्या 
महापालिका क्षेत्रात पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या एकूण १४९ शाळा आहेत. यातील १३५ शाळा आज उघडल्या. तत्पूर्वी शिक्षण विभागाने नियुक्ती केलेल्या पथकांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पाहणी केली होती. शाळा सुरू करण्याबाबत शाळांकडून तसे प्रमाणपत्रही घेतले होते. आता शाळा सुरू झाल्यानंतर ही पथके पुन्हा एकदा शाळांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. दरम्यान, १४९ पैकी १४ शाळांनी अद्याप प्रमाणपत्र सादर केलेले नसल्याने त्या सुरू झालेल्या नाहीत. काही शाळा समाजकल्याण विभागाअंतर्गत तर काही शाळा या निवासी असल्याने तांत्रिक अडचणींच्या पूर्ततेअभावी या शाळा सुरू झाल्या नसल्याची माहिती मिळाली. आवश्‍यक प्रक्रिया व वरिष्ठ पातळीवरून सूचना मिळाल्यानंतर या शाळाही सुरू होतील अशी अपेक्षा आहे. 

संमतिपत्रांची संख्या कमीच 
१४९ शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे सुमारे ३९ हजार विद्यार्थी आहेत. यातील केवळ सात ते साडेसात हजार विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतिपत्र प्राप्त झाले आहेत. एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत संमतिपत्रांची ही संख्या कमी असली तरी येत्या काळात ही संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, शाळांना कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्ती व उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news school open and student come class room