गुरुजी आम्ही शाळेत येणारच..!

जगन्नाथ पाटील
Wednesday, 3 February 2021

बळजबरीने जिल्हा परीषद शाळांमध्ये जावू लागले आहेत. किमान दोन तास हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची गुरुजी आणि बाईंना मनधरणी करावी लागत आहे.

कापडणे (धुळे) : आठ डिसेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरु झाल्या. दुसर्‍या टप्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. आता केवळ प्राथमिक शाळा सुरु होण्याचे शेष आहे. घरातील भांवडे शाळेत जावू लागल्याने लहान मंडळीही घरी थांबायला तयार नाहीत. ते बळजबरीने जिल्हा परीषद शाळांमध्ये जावू लागले आहेत. किमान दोन तास हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची गुरुजी आणि बाईंना मनधरणी करावी लागत आहे. समजवून घरी पाठवित आहेत. तर गुरूजी आम्ही शाळेत आम्ही येणारच असे म्हणत विद्यार्थी घरचा मार्ग धरत आहेत.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता घसरली?
कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचा मोठा गाजावाजा झाला आहे. पण हे अध्यापन विद्यार्थ्यांपर्यंत कितपत पोहचले, हे संशोधनाचा विषय झाला आहे. मात्र पाचवी ते दहावीच्या जाणत्या विद्यार्थ्यांचीच गुणवत्ता ढासळल्याचे पुढे येवू लागले आहे. तेव्हा प्राथमिक शिक्षणाची केविलवाणी अवस्था झाली आहे, असे पालकच नव्हे तर शिक्षक आपांपसात कुजबुजत आहेत.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बळजबरी हजेरी
पाचवी ते बारावीच्या शाळा गजबजू लागल्या आहेत. आता प्राथमिकचे विद्यार्थीही घरी राहायला तयार नाहीत. तेही शाळेकडे धाव घेत आहेत. शाळेच्या वऱ्हाड्यांवर ठाण मांडून बसत आहेत. शिक्षकांकडून दीड दोन तास अभ्यास करुन घेत आहेत. आम्हाला शाळेत बोलविण्याची परवानगी नाहीये. तुम्ही जा घरी, असे सांगूनही विद्यार्थी ठाण मांडून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दहा महिने घरी कंटाळलेले आणि मोठी भावंडेही शाळेत जावू लागल्याने बच्चे कंपनीचा शाळेकडे वळलेला मोर्चा वाखणण्यासारखाच असल्याचे बोलले जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news school open small child going school