esakal | तळहाताच्या आकाराऐवढा ‘हेजहॉग’; दुर्मिळ प्राण्याची राज्‍यात दुसरीच नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

hedgehog

आकाराने लहान व मातीशी मिळताजुळता रंग असल्याने तो सहसा कोणाच्या नजरेस पडत नाही. गुजरातमधील नवसारीपासून पुढील भागात हेजहॉगची संख्या लक्षणीय आहे. 

तळहाताच्या आकाराऐवढा ‘हेजहॉग’; दुर्मिळ प्राण्याची राज्‍यात दुसरीच नोंद

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : आढे (ता. शिरपूर) शिवारात हेजहॉग हा दुर्मिळ प्राणी आढळून आला. त्याच्या अस्तित्वाबाबत धुळे जिल्ह्यातील ही पहिली, तर महाराष्ट्रातील दुसरी नोंद आहे. औषधोपचार करून हेजहॉगला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. 
आढे शिवारातील धनंजय मराठे यांच्या शेतात चारा काढताना एक अशक्त प्राणी आढळला. त्याच्या बाह्य रूपावरून साळिंदराचे पिलू वाटल्याने त्यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश बारी यांना सूचित केले. डॉ. बारी यांनी घटनास्थळी पोचून पाहणी केली असता, तो प्राणी साळिंदर नसून हेजहॉग नामक दुर्मिळ वन्यप्राणी असल्याचे सांगितले. डॉ. बारी यांनी हेजहॉगच्या अस्तित्वाबाबत अनेर डॅमचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंदळ यांना माहिती दिली. शहरातील नेचर कंझर्वेशन फोरमचे प्राणिमित्र अभिजित पाटील, वनरक्षक मनोज पाटील, महेश करंकाळही घटनास्थळी पोचले. 

नैसर्गिक अधिवासात सोडले
हेजहॉग अशक्त झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या उपचाराची जबाबदारी वन विभागाने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेचर कंझर्वेशन फोरम संस्थेकडे दिली. सलग चार दिवस उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने हेजहॉगला नैसर्गिक अधिवासात सोडले. शिरपूर वनक्षेत्राचे सहाय्यक वनसंरक्षक अमितराज जाधव, वनपाल नितीन बोरकर, योगेश वारुडे, यश नेरकर, मोइन तेली, मुक्तार फकीर, राहुल गिरासे आदी उपस्थित होते. 
 
राज्यात दुसरी नोंद 
यापूर्वी हेजहॉग हा वन्यप्राणी काही वर्षांपूर्वी साताऱ्‍याचे प्राणिमित्र अमित सय्यद यांना नंदुरबार जिल्ह्यात आढळला होता. ती राज्यातील पहिली नोंद होती. त्यानंतर दुसऱ्यांदा तो शिरपूर तालुक्यात आढळला. हेजहॉग निशाचर प्राणी असून, मानवी तळहाताइतका त्याचा आकार असतो. त्याचे वजन ५०० ते ७०० ग्रॅम असून, पाली, छोटे सरडे, लहान साप, गांडूळ आदी त्याचे प्रमुख भक्ष्य आहेत. आकाराने लहान व मातीशी मिळताजुळता रंग असल्याने तो सहसा कोणाच्या नजरेस पडत नाही. गुजरातमधील नवसारीपासून पुढील भागात हेजहॉगची संख्या लक्षणीय आहे. 
 
हेजहॉग गुजरातमधून शेतमालाच्या वाहतुकीसोबत पोचल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र चौकशीअंती तशी वाहतूक झाली नसल्याचे निष्पन्न झाले. तालुक्याच्या जैवविविधतेत भर पडणे ही समाधानाची बाब आहे. संस्थेने संगोपन केलेल्या हेजहॉगवर लवकरच शोधनिबंध प्रकाशित होणार आहे. 
-अभिजित पाटील, प्राणिमित्र 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image