esakal | ‘ब्रेक द चेन’ऐवजी ‘ब्रेक द रुल्स’ची स्पर्धा 
sakal

बोलून बातमी शोधा

break the chain

शासकीय कर्फ्यूचा अपवाद वगळता शिरपुरात जनता कर्फ्यूसारखे उपक्रम नेहमीच फसल्याचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना जीवनावश्यक सेवेत टाकून जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेचाही फज्जा उडणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

‘ब्रेक द चेन’ऐवजी ‘ब्रेक द रुल्स’ची स्पर्धा 

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेला शिरपूरकरांनी ‘ब्रेक द रुल्स’ अशी प्रतिमोहीम राबवून उत्तर दिले असावे, असे वाटण्यासारखी गर्दी गुरुवारी (ता. ८) दुपारपर्यंत मेन रोडवर होती. शहराच्या मुख्य रस्त्यांवर फळे आणि भाजीपाला घेऊन अनेक हातगाड्यांनी अतिक्रमण केले होते. त्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी, बंद बाजारपेठ पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे नागरिकांच्या झुंडी वाहनांवरून, पायी फिरताना दिसून आल्या. 
शासकीय कर्फ्यूचा अपवाद वगळता शिरपुरात जनता कर्फ्यूसारखे उपक्रम नेहमीच फसल्याचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना जीवनावश्यक सेवेत टाकून जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेचाही फज्जा उडणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. गेल्या दोन दिवसांत शिरपूरकरांनी ती सार्थ ठरवली. नेहमीपेक्षा जास्तच गर्दी मुख्य रस्त्यांवर दिसून आली. गर्दीला अटकाव करण्यासाठी कोणत्याच यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हते. लोकांनी, लोकांसाठी सुरू केलेली लोकांची मोहीम असल्याप्रमाणे प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’च्या बोजवाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. 

हातगाड्यांची संख्या दुप्पट 
शासनाने नियम जाहीर करताना फळे व भाजीपाला विक्रीला सूट दिली आहे. तिचा गैरफायदा घेऊन शहरात हातगाड्यांची संख्या अनेक पटीने वाढल्याचे दिसून आले. कपडे, स्टेशनरी, सलून, कॉस्मेटिक्स आदी विविध दुकाने बंद असल्यामुळे तेथील जागा सांभाळण्यासाठी सकाळपासून फेरीवाल्यांमध्ये चढाओढ लागली होती. रस्त्यांवर दुतर्फा हातगाड्यांचे साम्राज्य होते. यापूर्वी एकाच हातगाडीवर विविध भाज्या विकणाऱ्यांनी गुरुवारी एका गाडीवर एकच भाजी अशा धोरणाने व्यवसाय केल्याने ही संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून खरेदीच्या बहाण्याने व बाजारात फेरफटका टाकण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची गर्दी उसळली. 

निर्बंध तरीही वाहतुक कोंडी
निर्बंधांच्या काळातही शहरातील भैरवमंदिराजवळ अनेकदा वाहतुकीची कोंडी झाली. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आदी नियमांचा तर कोणालाही पत्ता नसल्यासारखी परिस्थिती होती. त्यामुळे अशा पद्धतीने ‘ब्रेक द चेन’ मोहीम अनेक वर्षे राबविली, तरी कोरोना इंचभरही मागे हटणार नाही, अशा प्रतिक्रिया सुजाण नागरिकांनी दिल्या. 

संपादन- राजेश सोनवणे

loading image