घराच्या बाहेर खेळता- खेळता बालक झाले गायब; दुसऱ्या दिवसाची पहाट उजळली अन्‌

सचिन पाटील
Monday, 11 January 2021

खेळताना दोघेही दिसेनासे झाले. धास्तावलेल्या पालकांनी शहर व परिसरात शोध घेतला. मात्र दोघांचा मागमूस लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही शोधमोहीम राबविली.

शिरपूर (धुळे) : भरदुपारी शहराच्या गजबजलेल्या भागातून सातवर्षीय बहीण आणि चारवर्षीय भाऊ खेळता खेळता बेपत्ता झाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही त्यांचा तपास न लागल्यामुळे त्यांचे अपहरण झाल्याच्या संशयावरून पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र २४ तासांतच दोघांनाही सुखरूप शोधून त्यांना आई-वडिलांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला. 
येथील न्यायालयासमोर जनतानगरमध्ये तुफान पावरा राहतात. त्यांना सुनंदा व साहिल ही दोन अपत्ये आहेत. शनिवारी (ता. ९) सकाळी अकराला घराजवळ खेळताना दोघेही दिसेनासे झाले. धास्तावलेल्या पालकांनी शहर व परिसरात शोध घेतला. मात्र दोघांचा मागमूस लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनीही शोधमोहीम राबविली. तथापि, उपयोग झाला नाही. त्यामुळे सुनंदा व साहिलचे अपहरण झाल्याचा संशय पावरा यांनी व्यक्त केला. अज्ञातांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन निरीक्षक हेमंत पाटील यांनी दोन तपासपथके तयार केली. उपनिरीक्षक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तपासकार्य सुरू झाले. 

बालक रडत पोहचले शेतात
निमझरी (ता. शिरपूर) येथील आर. सी. पटेल आश्रमशाळेसमोर शेतात राहणारे सालदार मिठाराम पावरा, पिंटू पावरा, सरदार पावरा आदींना सायंकाळी झोपडीबाहेर लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता मुलगा व मुलगी रडताना आढळले. त्यांची विचारपूस केली असता भोईटी या नावाशिवाय त्यांना काहीच सांगता आले नाही. रात्री दोघांना जेवण देऊन झोपडीतच झोपविले. 

अन्‌ अश्रू झाले अनावर
पहाटेच त्यांना घेऊन संबंधितांनी निमझरी गाव गाठून तेथील ग्रामस्थांना सर्व माहिती दिली. गावातून भोईटी (ता. शिरपूर) येथे संपर्क साधला असता तेथील मूळ रहिवासी व सध्या शिरपूरला राहणाऱ्या तुफान पावरा यांच्या मुलांचे अपहरण झाल्याबाबत माहिती मिळाली. दोन्ही मुलांना पोलिस ठाण्यात नेले. त्यांना सुखरूप परतल्याचे पाहून पावरा व त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. मुलांची काळजी घेणाऱ्या आदिवासी कुटुंबांचे त्यांनी आभार मानले. दोन्ही मुले खेळताना वाट चुकून निमझरीकडे निघून गेल्याचा अंदाज आहे. २४ तासांत या प्रकरणाचा निपटारा झाल्याने पोलिसांनी समाधान व्यक्त केले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shirpur brother and sister missing police searching