
दुर्गम भागातील अतिक्रमित वन जमिनीत सुरु असलेल्या गांजा लागवडी विरोधात सांगवी पोलिसांनी व्यापक मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत टेहळणी करुन खबऱ्यांचे जाळे तयार करुन माहिती गोळा केली जात आहे.
शिरपूर (धुळे) : महादेव दोंदवाडा (ता.शिरपूर) येथील सोनज्या पाड्यातील गांजाची शेती सांगवी पोलिसांनी उध्वस्त केली. 26 जानेवारीला केलेल्या कारवाईत दोन क्विंटलहून अधिक ओला गांजा पोलिसांनी जप्त केला. एका विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुर्गम भागातील अतिक्रमित वन जमिनीत सुरु असलेल्या गांजा लागवडी विरोधात सांगवी पोलिसांनी व्यापक मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत टेहळणी करुन खबऱ्यांचे जाळे तयार करुन माहिती गोळा केली जात आहे. महादेव दोंदवाडा शिवारात सोनज्यापाडा येथील कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. त्यांनी सांगवी वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम व सहकाऱ्यांना सोबत घेऊन 26 जानेवारीला रात्री नऊला संशयित गेंदाराम झिपा पावरा याच्या शेतावर छापा टाकला.
चार लाख किंमतीचा गांजा
पोलिसांना पाहून संशयित अंधारात फरार झाला. शेतात चार ते सहा फूट उंचीची गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी झाडे तोडून जप्त केली. त्यांचे वजन दोन क्विंटल पाच किलो 700 ग्रॅम असून एकूण किंमत चार लाख 11 हजार 400 रुपये आहे. हवालदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन सांगवी पोलिसांनी संशयित गेंदाराम पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हवालदार लक्ष्मण गवळी, योगेश दाभाडे, मोरे, पवार आदिंनी ही कारवाई केली.
संपादन ः राजेश सोनवणे