
सावेर गावापासून एक किलोमीटरवर भिका गंगाराम भिल याच्या शेतातील झोपडीमध्ये हा कारखाना सुरू होता. तेथे बनावट मद्य तयार करून बाटल्यांमध्ये सील करून विक्री केले जात असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक निरीक्षक सचिन साळुंखे यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला.
शिरपूर (धुळे) : सावेर (ता. शिरपूर) येथे झोपडीत सुरू असलेला बनावट मद्यनिर्मिती कारखाना थाळनेर पोलिसांनी सोमवारी (ता. २२) सकाळी छापा टाकून उद्ध्वस्त केला. दोन संशयितांना अटक केली असून, दोन जण फरारी झाले. घटनास्थळावरून दोन चारचाकी वाहनांसह एकूण पावणेआठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सावेर गावापासून एक किलोमीटरवर भिका गंगाराम भिल याच्या शेतातील झोपडीमध्ये हा कारखाना सुरू होता. तेथे बनावट मद्य तयार करून बाटल्यांमध्ये सील करून विक्री केले जात असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक निरीक्षक सचिन साळुंखे यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. पोलिसांनी संशयित बबलू सोनू मोरे (वय ३४, रा. भरतसिंहनगर, शिरपूर) व हरेश टपूभाई पटगीर (४२, रा. रोजमाळ, जि. बोटाद, गुजरात) यांना अटक केली. पळून गेलेल्या संशयितांत मानसिंह मनजीभाई कणसागरा (रा. सुरई, जि. सुरेंद्रनगर, गुजरात) व गोरख रामजी भरवाड (रा. सावेर) यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले.
असा मुद्देमाल जप्त
घटनास्थळावरून पोलिसांनी मॅक्डॉवेल्स नं. १ रिझर्व्ह व्हिस्कीच्या ४८ बाटल्या, रिकाम्या बाटल्या भरलेल्या दोन गोणी, बूच भरलेली एक गोणी, १० लिटर स्पिरिट भरलेली कॅन, रंग व सुगंधमिश्रित ३५ लिटर स्पिरिटचे रसायन, नरसाळे, इसेन्स, रिकामी १५ खोकी, एक स्विफ्ट डिझायर (एमएच ०२, सीव्ही १४१३) कार, तिच्या डिकीत भरलेली व्हिस्कीची १० खोकी, एक मारुती अल्टो (जीजे ३३, बी ३६६९) कार, तिच्या डिकीत भरलेली व्हिस्कीची दहा खोकी असा एकूण सात लाख ८६ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संशयित बबलू मोरे याच्या मालकीचा हा कारखाना असल्याचा संशय आहे. चारही संशयितांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक निरीक्षक सचिन साळुंखे, हवालदार सिराज खाटीक, कृष्णा पावरा, मालचे, राहुल बैसाणे आदींनी ही कारवाई केली.
संपादन ः राजेश सोनवणे