esakal | काम न करताच सादर केली खोटी बिले; दोन अभियंते निलंबित  
sakal

बोलून बातमी शोधा

suspended

स्वतः स्वाक्षरी करून खोटे बिल मंजूर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे व कामात अनियमितता बाळगणे अशा आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली.

काम न करताच सादर केली खोटी बिले; दोन अभियंते निलंबित  

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : काम न करताच खोटी बिले सादर केल्याप्रकरणी येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. आर. पाटील व कनिष्ठ अभियंता व्ही. एम. चव्हाण यांना गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी निलंबित केले. 
गिधाडे (ता. शिरपूर) येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत भूमिगत गटारीच्या कामात स्वतः स्वाक्षरी करून खोटे बिल मंजूर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे व कामात अनियमितता बाळगणे अशा आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली. संबंधित कामाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन लाख ९९ हजार रुपयांच्या तांत्रिक खर्चाला मंजुरी दिली होती. 

फेरमुल्‍यांकनात आढळले सत्‍य
संबंधित अभियंत्यांनी सादर केलेल्या मोजमाप पुस्तिकेतील नोंदींचा संशय आल्याने गटविकास अधिकारी शिंदे यांनी १३ जानेवारीला गिधाडे येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी कामाचे फेरमूल्यांकन केले असता, केवळ एक लाख ४४ हजार २३६ रुपयांचे काम झाल्याचे आढळले. संशयित अभियंता पाटील आणि चव्हाण यांनी मात्र एक लाख ५५ हजार ६६४ रुपयांचे अतिरिक्त मूल्यांकन काम केलेले नसतानाही मोजमाप पुस्तकात नमूद केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्री. शिंदे यांनी उभयतांना कारणे दाखवा नोटीस बजावली. विहित मुदतीत दोघेही समाधानकारक उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्यांना निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे