मामाचे गाव राहिले दूर; पिता-पुत्रीचा अपघाती मृत्‍यू

एल. बी. चौधरी
Sunday, 14 February 2021

लाडक्या चिमुकली लेकीला घेवून शिरपूरला शालकाकडे जात होते. चिमुकली देखील मामाच्या गावाला जायचे म्‍हणून आनंदात होती. परंतु, मामाची भेट होण्यापुर्वीच तिचा मृत्‍यू झाला.

सोनगीर (धुळे) :  मुंबई- आग्रा महामार्गावरील नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे रेल्वे उड्डाणपुलावर धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील पिता- पुत्री जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. मृत सोंडले (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी आहेत.
धुळ्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक एमएच 13, एएक्स 2856) नरडाणा उड्डाणपूल संपताच डाव्या बाजूला वळण घेण्यासाठी हळू झाला. या दरम्‍यान मागून येणाऱ्या मोटारसायकलने (क्रमांक एमएच 18 एएफ 0422) धडक दिली. जोरदार धडकेमुळे मोटारसायकलवरील स्मितल सुभाष फुले (वय 32) व त्यांची मुलगी उषा (वय 6) हे जागीच ठार झाले. त्यांना नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे शवविच्छेदन होऊन दुपारी चारच्या सुमारास सोंडले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मामाच्या भेटील जात होती चिमुकली
मयत फुले हे लाडक्या चिमुकली लेकीला घेवून शिरपूरला शालकाकडे जात होते. चिमुकली देखील मामाच्या गावाला जायचे म्‍हणून आनंदात होती. परंतु, मामाची भेट होण्यापुर्वीच तिचा मृत्‍यू झाला. शालक दीपक संतोष सोनवणे (राहणार वरवाडे, शिरपूर) यांनी अपघाताची खबर दिली. मयत स्मितल फुले हे नगाव येथील गंगामाई विद्यालयात शिक्षक असून ते मुळ धनूर (ता. धुळे) येथील रहिवासी असून वडील सुभाष रामदास चौधरी हे सोंडले आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. पुढील तपास पोलीस योगेश सोनवणे व महिला पोलीस भारती भोसले करीत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shirpur road accident father and doughter death