तापी नदीत तरंगणारे पोते दिसले; बाहेर काढल्‍यानंतर उघडकीस आला प्रकार आणि फुटले बिंग

सचिन पाटील
Thursday, 24 December 2020

उपरपिंड (ता. शिरपूर) शिवारात तापी नदीत सुलवाडे बॅरेजच्या २५ क्रमांक गेटजवळ तरंगणारे पोते ग्रामस्थांना आढळले. त्यांनी संशयावरून पोलिसांना कळविले. पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने पोते बाहेर काढले असता,

शिरपूर (धुळे) : डोक्यात घाव घालून खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह पोत्यात भरून तापी नदीत फेकल्यावरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. महिलेची ओळख पटू शकली नाही. 
उपरपिंड (ता. शिरपूर) शिवारात तापी नदीत सुलवाडे बॅरेजच्या २५ क्रमांक गेटजवळ तरंगणारे पोते ग्रामस्थांना आढळले. त्यांनी संशयावरून पोलिसांना कळविले. पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने पोते बाहेर काढले असता, त्यात महिलेचा मृतदेह आढळला. पाण्यात जास्त वेळ लागल्याने मृतदेह कुजू लागला होता. त्याचा एक पाय जलचरांनी खाल्ल्याचे आढळले. मृत महिलेचे वय ३५ ते ४० वर्षे असून, तिच्या अंगात गाउन, ब्लाउज, परकर अशी वस्त्रे आहेत. हातात धातूच्या बांगड्या व मनगटी घड्याळ आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळे येथे पाठविला. 

आणि वाचा फुटली
वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत मृत महिलेच्या डोक्याच्या मागील भागात खोलवर जखम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला डोक्यात घाव घालून मारल्यानंतर पोत्यात भरून नदीत फेकल्याचा संशय आहे. मोठे दगड भरून पोत्याचे तोंड बंद केले होते. त्यामुळे पोते तळाशी जाऊन मृतदेह पाण्यात कुजून नष्ट होईल, असा संशयिताचा हेतू असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, मृतदेह पोत्यासकट पाण्यावर तरंगू लागल्याने या खुनाला वाचा फुटली. 

वेगवेगळे अंदाज
ओळख पटू शकेल, अशी वस्तू मृतदेहाजवळ आढळली नाही. त्यामुळे पोलिस शिरपूरसह परिसरातील बेपत्ता महिलांचे रेकॉर्ड तपासत आहेत. संबंधित पोलिस ठाण्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. मृतदेह नक्की कधी व कुठून फेकण्यात आला याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. शहर पोलिसांत अज्ञात संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news shirpur tapi river women death body open murder case