esakal | खुशखबर..एमएच १८ ला टोलवर सूट 
sakal

बोलून बातमी शोधा

toll naka

धुळेकरांच्या स्थानिक खासगी वाहनाला वसूल होत असलेल्या प्रती टोलमधून ८७.५ टक्के सूट आणि मालवाहतूक वाहनाला टोलमधून ७५ टक्के सूट देण्याबाबत यशस्वी चर्चा केली.

खुशखबर..एमएच १८ ला टोलवर सूट 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : शहरासह जिल्ह्यातील एमएच १८ या आरटीओ विभागाच्या सांकेतिक क्रमांकाच्या निरनिराळ्या खासगी व मालवाहतूक वाहनांना मुंबई- आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्यावर काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. नववर्षानिमित्त एमआयएमचे येथील आमदार डॉ. फारूक शाह यांनी शनिवारी (ता. २) धुळेकरांना ही खुशखबर दिली. तसेच महामार्गावर पाहणी करत त्यांनी समस्यांचे निराकरण करण्याची सूचना टोल नाका व्यवस्थापनाला दिली. 
आमदार शाह यांनी लळींग टोल नाका व्यवस्थापनाचे येथील प्रमुख प्रतिनिधी संजय गुरव यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार एमएच १८ या धुळेकरांच्या स्थानिक खासगी वाहनाला वसूल होत असलेल्या प्रती टोलमधून ८७.५ टक्के सूट आणि मालवाहतूक वाहनाला टोलमधून ७५ टक्के सूट देण्याबाबत यशस्वी चर्चा केली. नंतर स्थानिक खासगी वाहनांना वसूल होत असलेल्या प्रती टोलच्या फक्त १२.५ टक्के, तर मालवाहतूक वाहनाला २५ टक्के टोल द्यावा लागेल, असे आमदार शाह यांनी सांगितले. त्यामुळे आता एमएच १८ चे वाहन चांदवड टोलनाक्याच्या आत कुठेही गेले आणि परतले तरी त्यांना या सवलतीचा लाभ मिळू शकेल. 
 
चौफुलीवर पाहणी 
शहरालगत मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अनेक दिवसांपासून अपघात होत आहेत. यात चाळीसगाव चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बंद आहे. त्यामुळे दिवसभर वाहतुकीची कोंडी होऊन चालकांमध्ये वादाचे प्रकार उद्‌भवतात. प्रसंगी तणावाची स्थिती निर्माण होऊन कायदा- सुवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवतो. यासह महामार्गावरील विविध समस्यांची गांभीर्याने दखल घेत आमदार शाह यांनी टोलनाका व्यवस्थापक गुरव यांच्या समवेत चाळीसगाव चौफुलीवर पाहणी केली. आदिल शाह, डॉ. शाहीद शेख, परवेज शाह, निलेश काटे, आसिफ शाह, युसुफ पिंजारी, जाकीर शाह, मुनावर शाह, सईदभाई बर्तनवाले, रफिक शाह आदी उपस्थित होते. 
 
टोल वसुलीबाबत इशारा 
आमदार शाह यांनी महामार्गावर समस्यांची पाहणी केली. परिसरातील प्रार्थना स्थळाजवळील सर्व्हिस रोड, पथदिवे, गटारी आदींबाबत समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची सूचना आमदारांनी श्री. गुरव यांना दिली. कोरोनाच्या संकटकाळात महामार्गावर झालेला खून, जबरी चोऱ्या, अपघात यासारख्या विविध घटनांमुळे धुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे चौपदरीकरणातील महामार्गावरील समस्या तरतुदीनुसार टोलनाका व्यवस्थापनाने सोडविल्या नाहीत, तर टोलवसुली बंद पाडण्याचा इशारा आमदार डॉ. शाह यांनी दिला. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग तीनचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे आणि व्यवस्थापक गुरव यांना वाहनधारकांच्या समस्या अवगत करून दिल्या. 
 
सोनगीर टोलवरही सवलत 
सोनगीरजवळील टोल नाक्यावर २७५ रुपयांचा भरणा केला तर एमएच १८ चे निरनिराळे खासगी वाहन तापीनदीच्या पुलापर्यंत महिनाभर जा- ये करू शकेल, असेही आमदार शाह यांनी सांगितले. या सुविधेचा असंख्य वाहनधारकांना लाभ होऊ शकेल. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image