पोलिस पाटीलांनीही घातली तहसीलदारांशी हुज्‍जत; वाळूचे ट्रॅक्‍टर पळविण्यास मदत

valu mafiya
valu mafiya

चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा तालुक्यात वाळू व मुरूम माफियांनी कहर केले आहे. आता तहसीलदार, अप्पर तहसीलदार, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी यांच्यावर जीव घेणे हल्ले होवू लागले आहेत. 26 जानेवारी प्रजासत्‍ताक दिनी अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन व अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार सुनील सैदाणे हे पथकासह गेले असता दोन टॅक्टर वाळू वाहतूक करताना सापडले. अक्कडसे येथील पोलिस पाटीलसह सहा जणांनी हुज्जत घालत टॅक्टर पळविले. म्हणून शिंदखेडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन महिन्यापूर्वी दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्यावर ही मुरूम माफियांनी हल्ला केला होता. 
शिंदखेडा महसूल मंडळ अधिकारी पंडीत दावळे (वय ३१) यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्‍या फिर्यादीत म्हटले आहे, की मंगळवारी (ता.26) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तहसीलदार सुनिल सैंदाणे यांना गुप्त माहिती मिळाली. अक्कडसे गावालगत तापी नदी पात्रातुन अक्कडसे येथील पोलीस पाटील सुनिल कोळी हा अवैध उत्खनन व वाळु वाहतुक करीत असल्याची बातमी मिळाली. त्यावरुन अक्कडसे येथे अवैध उत्खनन व अवैध वाळु वाहतुक करीत असलेल्या वाहनावर कार्यवाही करण्यासाठी सांगितल्यावरुन तहसीलदार सुनिल सैंदाणे, फौजदारी कारकून रोहिदास कोळी व पाटण कोतवाल रविंद्र बोरसे कोतवाल खासगी वाहनाने गेले. 

दोन ट्रॅक्‍टर वाळूने भरलेले
अक्कडसे गावाकडुन वरसुस गावाकडे जाणारा गाडरस्त्याजवळ टॅक्टर वाळुने भरलेले येतांना दिसुन आले. ट्रॅक्टर थांबविले असता पुढे उभे असलेले जॉन डिअर हिरव्या रंगाचे नंबर नसलेले त्यावरील वाहन चालक  चेतन कोळी (रा. अक्कडसे) व टॅक्टर मालक अक्कडसे पोलिस पाटील सुनिल कोळी आणि दुसरे टॅक्टर चालक आकाश कोळी व ट्रॅक्टर मालक राहुल कोळी (दोघी रा.अक्कडसे) यांना शिंदखेडा पोलीस ठाण्यात येथे घेऊन चला असे सांगितले. 

आम्‍ही गावचे गुंड म्‍हणत सुरू केली मारहाण
दरम्‍यान अक्कडसे गावाकडुन मोटार सायकल (एमएच १८ बी.एफ. ०७१२) हिरो कंपनीच्या मोटार सायकलवर पोलिस पाटील सुनिल कोळी, राकेश कोळी व राहुल कोळी हे आले. व त्यावेळी राहुल कोळी याने म्हटले की, आम्ही गावांतील गुंड आहोत आणि सुनिल कोळी अक्कडसे गावाचा पोलीस पाटील आहे. तापी नदी पात्रातुन अवैध वाळु उत्खनन व अवैध वाळू वाहतुक करतो. वाळु वाहतुकीचा परवाना नाही असे सांगुन मंडळ अधिकारी दावळे यांना दम देत तुम्हाला माहिती नाही का? तहसिलदार सैदाणे हे नवीन आहेत? त्यांना आम्ही कोण; याची कल्पना दिली नाही का? त्यावेळेस मंडळ अधिकारी दावळे व कोतवाल  रविद्र बोरसे यांना शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. 

आणि अंगावर आणले ट्रॅक्‍टर
तहसिलदार सैदाणे हे वाचविण्यासाठी जवळ आले असता त्यांना ही शिवीगाळ केली. तहसीलदार सैंदाणे व फौजदारी कारकून रोहीदास कोळी हे त्यांना मारहान करु नका अशी विनंती करीत असतांना ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मंडळ अधिकारी दावळे यांना मारहाण करीत याने त्यांचे ट्रॅक्टर चालकांना टॅक्टरच्या टॉलीमधील वाळू उपसून पळून जा असे सांगितले. वाळुने भरलेले टॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता क्रमांक नसलेले ट्रक्टर मंडळ अधिकारी दावळे यांना ठार मारण्याच्या उद्देशाने  अंगावर घालुन जवळुन कट मारुन तेथुन दोन्ही ट्रॅक्टर पळवुन नेले.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल
शिंदखेडा पोलिस ठाण्यात पोलिस पाटील सुनिल कोळी, राकेश कोळी, राहुल कोळी, चेतन कोळी (चालक), आकाश कोळी (सर्व रा. अक्कडसे) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, वाळू चोरी, रस्ता अडवणे, बेकायदेशीर जमा जमविणे, मारहाण करणे, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, लोकसेवकांना जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा व कोरोना काळात संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत वळवी करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com