अवैध वाळू वाहतुकदारांकडून तलाठीस मारहाण

एल. बी. चौधरी
Monday, 1 February 2021

विजय बेहरे व सोनगीरचे तलाठी जितेंद्र चव्हाण हे शासकीय वसुलीच्या कामासाठी वडेलमार्गे कापडणे येथे जात असताना ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यास हटकल्याने चालक नितीन पाटील याने तलाठी बेहरेच्या उभ्या मोटारसायकलला ट्रॅक्टरने धडक देत

सोनगीर (धुळे) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकास हटकल्याने तिघांनी तलाठीला मारहाण व शिवीगाळ करण्याचा प्रकार तिसगाव ढंडाणे शिवारात रविवारी (ता. ३१) दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार संशयितांना अटक करून कडक कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी लेखणी बंद आंदोलन करतील असे निवेदन सोमवारी (ता. १) दुपारी राज्य तलाठी संघाच्या धुळे जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले आहे. याप्रकरणी तलाठी विजय बेहरे यांनी देवपूर पश्चिम पोलिस ठाण्यात रविवारीच गुन्हा दाखल केला आहे. 

विजय बेहरे व सोनगीरचे तलाठी जितेंद्र चव्हाण हे शासकीय वसुलीच्या कामासाठी वडेलमार्गे कापडणे येथे जात असताना ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यास हटकल्याने चालक नितीन पाटील याने तलाठी बेहरेच्या उभ्या मोटारसायकलला ट्रॅक्टरने धडक देत दहशत निर्माण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलने वसंत पाटील, किशोर पाटील, विकास पाटील यांना बोलावून घेत चौघांनी मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणाचा राज्य तलाठी संघाच्या धुळे जिल्हा शाखेने तीव्र निषेध करीत महसूल व पोलिस खात्याच्या वरिष्ठांना निवेदन दिले. अशा गुंडप्रवृत्तीच्या वाळू तस्करांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा तसेच कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावे. 

गौणखनिज वाहणाऱ्यांवरील कारवाईवर बहिष्‍कार
संशयित गुंडावर कारवाई होत नाही तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन केले जाईल तसेच वारंवार अशा घटना घडत असल्याने जिल्ह्यातील सर्वच वाळू तस्करांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही तोपर्यंत अवैध गौणखनिज वाहणाऱ्यांवर कारवाई करण्यावर बहिष्कार टाकत आहोत असे निवेदनात म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news valu vahtukdar tractor talathi heating