esakal | आरोप- प्रत्‍यारोपाऐवजी रूग्‍णसेवेत वेळ द्यावा; जिल्‍हाधिकारींचे लोकप्रतिनिधींना आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

nandurbar collector rajendra bharud

आरोप- प्रत्‍यारोपाऐवजी रूग्‍णसेवेत वेळ द्यावा; जिल्‍हाधिकारींचे लोकप्रतिनिधींना आवाहन

sakal_logo
By
टिम इ सकाळ

नंदुरबार : काही लोकप्रतिनिधींकडून जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत काही दिवसांपासून आरोप करण्यात येत आहेत. याबाबतचे वास्तव जनतेसमोर मांडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड (collector rajendra bharud) यांनी सोमवारी (ता.३) रात्री फेसबूक लाईव्हद्वारे (facebook live) जनतेशी संवाद साधत लोकप्रतिनिधींनी द्वेषभावना विसरुन कोरोनाला (coronavirus) हरविण्यासाठी एकत्र येत सामुहिकरित्या प्रयत्न करण्याचे आवाहन केले. (collector rajendra bharud facebook live political leader)

गेल्या महिन्याभरापासून रेमडेसिव्हिरवरुन राजकारण सुरु होते. लोकप्रतिनिधींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. दरम्यान, काही लोकप्रतिनिधींकडून रेमडेसिव्हिर वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. याबाबतचे वास्तव जनतेसमोर मांडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी फेसबूक लाईव्ह केले.

हेही वाचा: बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर; जळगाव जिल्‍ह्‍यात एक लाखावर बाधितांची कोरोनोवर मात

रेमडेसिव्हिरमध्ये भ्रष्‍ट्राचार नाही

ते म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. अशा परिस्थितीत रेमडेसिव्हिर उपलब्ध होणे कठीण झाले होते. रोटरी वेलनेस सेंटरला १ हजार इंजेक्शन ५९४ रुपये प्रमाणे दिले. याबाबत भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने प्राप्त यादीतील प्रत्येकाला संपर्क साधून उलट तपासणी केली असता रुग्णांना सदर इंजेक्शन संबंधित संस्थेकडून ५५० रुपयांना मिळाल्याचे समजले. यामुळे यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. तरी याबाबत तक्रार असल्यास शासनाकडे तक्रार करणे अपेक्षित आहे. काही लोकप्रतिनिधीनींनी याबाबत शासन, निती आयोग, पीएमओकडे तक्रार करुनही दखल घेतलेली नाही. यामुळे याबाबत अफवा व दिशाभूल करु नये.

हेही वाचा: रेल्वे स्थानकावरील भिकाऱ्यांची झाडाझडती

आरोप- प्रत्‍यारोपांऐवजी रूग्‍णसेवेत यावे

जिल्ह्यात आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने वैद्यकीय पदवी असणाऱ्या व सेवावृत्ती असल्यास जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून त्यास रुग्ण सेवा करण्यास परवानगी देण्याचे अधिकार आहेत. यामुळे वैद्यकीय पदवी असणाऱ्यांनी सेवाभावातून पुढे येण्याचे आवाहन केले. काही लोकप्रतिनिधींनी आरोप- प्रत्यारोपांऐवजी तेवढा वेळ रुग्णसेवेस दिला असता तर आणखी परिस्थिती बदलली असती, असेही डॉ. भारुड म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सुविधांची कमी असताना कोरोना काळात मोठे आव्हान उभे राहिले होते. आरोग्य विभागातील २५ ते ३० टक्के रिक्त होती. अशा परिस्थितीवर मात करीत आपण यशस्वीरित्या कोरोनाविरोधात लढा देत आहोत. यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.

तिसऱ्या लाटेची शक्‍यतेने तयारीच्या सुचना

जिल्ह्यात रेल्वे आयसोलेशन आणणे विशेष नव्हते. त्यासाठी रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांना जिल्हा प्रशासनाकडून पत्रव्यवहार केल्याचे डॉ. भारुड यांनी सांगितले. मात्र कोणताही अधिकारी श्रेय घेण्यासाठी आलेला नसून सेवाभावी वृत्तीतून आम्ही काम करीत आहोत. जिल्ह्यात सात डायलिसीस यंत्र, नवीन ब्लड बॅँक, २७ ॲम्बुलन्स, दोन शववाहिका, स्वत:ची आरटीपीसीआर लॅब, दुर्गम भागापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा आदी गोष्टी केल्या. सुविधा जनतेपर्यंत पोचविणे अधिकाऱ्याचे कर्तव्य असते. येत्या काळात जिल्ह्यात एक जम्बो हॉस्पिटल, दोन ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वितसाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. भारुड यांनी सांगितले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेवून आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी मनातील द्वेष बाजूला ठेवून कोरोना संकटात मदतीचे आवाहन त्यांनी केले.

राजकारण आणि माझा संबंध नाही

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील माझे गाव असले तरी राजकारण आणि माझा काही संबंध नाही. गेल्या काही दिवसांपासून काही जणांनी मी राजकारणात सक्रीय होणार असल्याबाबतच्या अफवा पसरविल्या होत्या. खरे तर मी एक अधिकारी असून सेवाभावी वृत्तीने जनतेची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. अधिकारी म्हणून आमची नेहमी बदली होते. काही दिवसांसाठी जिल्ह्यात असून जेवढे दिवस जिल्ह्यात असणार तेवढे दिवस प्रामाणिकपणे जिल्ह्याच्या जनतेपर्यंत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. भारुड म्हणाले.

loading image