नंदुरबारसह सर्व तालुक्यांच्या शहरात कडकडीत बंद; रस्ते निर्मनुष्य 

nandurbar corona lockdown
nandurbar corona lockdown

नंदुरबार : महिनाभरापासून कोरोनाचा वाढलेला उद्रेक लक्षात घेता त्याचा संसर्ग साखळी तोडण्यासाठी व कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा ‘जनता कर्फ्यू’ हाच एकमेव उपाय असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पालिका क्षेत्रातील शहरांमध्ये वीकेंडला शनिवार व रविवार सलग दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला होता. त्यानुसार शनिवारी (ता.२७) पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिक, व्यापारी, विक्रेते व उद्योजकांनी आपले व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के सहभाग नोंदवून ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी केला. दरम्यान, या बंदमध्ये एसटी बस बंद ठेवून प्रवाशांना शहराकडे येण्यापासून रोखून एसटी महामंडळाने सर्वांत मोठे काम केले आहे. 
कोरोनाची वर्षपूर्ती होत असताना परिस्थिती सावरेल व सर्वकाही पूर्वपदावर येईल, अशी आशा सर्वांना होती. मात्र झाले उलटेच. कोरोना आटोक्यात येण्याऐवजी तो पाचपटीने वाढला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गात सर्वांत शेवटी असलेला व ग्रीन झोनमध्ये प्रथम क्रमांकात मोडणारा नंदुरबार जिल्हा विशेषतः शहरी भागात कोरोनाने थैमान घातले आहे. वर्षभरात सुमारे पंधरा हजार जनतेला कोरोनाने ग्रासले असून, रोज चारशे ते पाचशे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात बेड मिळणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच तज्‍ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या यामुळे अधिकच ताण वाढला आहे. मृत्युदरातही वाढ झाली आहे. आत्तापर्यंत २७० वर रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शासन-प्रशासन हादरले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात आज व उद्या (ता.२८) दोन दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. 
 
यहाँ पे सब शांती... शांती है। 
आज सकाळपासूनच नागरिकांनी वैद्यकीय काम वगळता घरातच राहणे पसंत केले. बस बंद असल्याने ना ग्रामीण भागातील जनता शहरात येऊ शकली व शहराकडून कोणी ग्रामीण भागात किंवा इतर शहराकडे जाऊ-येऊ शकली तसेच सारे बाजारपेठ बंद असल्याने नागरिकांनी घरातच राहण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे शहरातील रस्ते पूर्णतः निर्मनुष्य झाले होते. सर्वत्र शांतता होती. रोज गर्दीने गजबजलेल्या चौकांत फक्त पोलिसांचेच अधिराज्य होते. 
 
अक्कलकुवा येथे शुकशुकाट 
रविवारी (ता. २८) होळी आहे. आज होळीचा बाजार गजबजणार होता. त्यासाठी व्यापाऱ्यांनी तयारी केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिल्याने व्यापाऱ्यांना आज बंद पाळावा लागला. बाजारपेठेत शुकशुकाट होता. नागरिकही घराबाहेर पडलेच नाहीत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून शंभर टक्के सहभाग नोंदवला. 

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com