नंदुरबारमध्ये कोरोनाने गाठला साडेसात हजाराचा आकडा 

धनराज माळी
Sunday, 3 January 2021

२२ मार्च पासून विचार केल्यास नंदुरबार जिल्हा साधारणत: तीन महिने अत्यंत सुरक्षित होता. मात्र त्यानंतर सुरूवात होऊन कोरोनाने सारा जिल्हा काबीज केला. अशाही परिस्थितीत धडगाव तालुका सुरक्षित होता.

नंदुरबार : जिल्ह्यात शासन-प्रशासन व नागरिक विविध उपाययोजना राबवून सुरक्षितता पाळत आहेत. मात्र कोरोना कमी होता होईना, अशी स्थिती आहे. कोरोनाने गेल्या दहा महिन्यांत जिह्यातील १७० जणांचा बळी घेतला तर साडे सात हजार जणांना त्याने ग्रासले आहे. त्यापैकी सात हजार रूग्णांवर योग्यवेळी उपचार झाल्याने ते बरे झाले. मात्र साडेपाचशे रूग्णांवर आजमितीस उपचार सुरू आहेत. 
२२ मार्च पासून विचार केल्यास नंदुरबार जिल्हा साधारणत: तीन महिने अत्यंत सुरक्षित होता. मात्र त्यानंतर सुरूवात होऊन कोरोनाने सारा जिल्हा काबीज केला. अशाही परिस्थितीत धडगाव तालुका सुरक्षित होता. मात्र कोरोनाने आता सातपुड्याच्या डोंगर दऱ्यांतूनही आता आपले डोके वर काढले आहे. गेल्या पंधरा दिवसांत धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळले होते. त्यामुळे आता संपूर्ण जिल्‍ह्यात कोरोनाने आपले पाय पसरविले आहेत. 

नंदुरबार व शहादा केंद्र बिंदू 
एकंदरीत दहा महिन्यांचा विचार केल्यास सर्वाधिक रुग्णाचं केंद्र बिंदू शहादा व नंदुरबार शहर ठरले. या दोन्ही शहरात मोठ्या प्रमाणात रूग्ण संख्या आढळली आहे. आतापर्यंत नंदुरबार शहर व परिसरातील दोन हजार आठशे पन्नास रूग्ण तर शहादा येथील तीन हजार रूग्ण कोरोनाचे आढळले आहेत. त्या पाठोपाठ तळोदा व नवापूर येथील प्रत्येकी साडेसातशे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्वाधिक बाधित हे नंदुरबार व शहादा या दोन शहरांमध्ये आढळले आहेत. आजच्या स्थितीतही या दोन शहरांमध्येच सर्वाधिक रूग्ण निघत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांमध्ये आत्तापर्यंत १७० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात नंदुरबार शहर व परिसरातील ५९ तर शहादा येथील ६२ जणांचा समावेश आहे. त्यानंतर तळोदा व नवापूर शहाराचा क्रमांक लागतो. सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. मात्र बाधितांची संख्या कधी कमी तर कधी एकाच दिवशी मोठा आकडा निघत असल्याने कोरोना अद्यापही जिल्ह्यात ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे. 
 
कोरोना अपडेट 
तालुका - बाधित रूग्ण.. मृत्यू... उपचार घेत असलेले - बरे झालेले 

नंदुरबार - २८४८..... - ५९...….. १७०...…….. २६१६ 
शहादा - ३०४२...…. ६२...…... २८९...…….. २६९१ 
तळोदा - ७३०...…. २७...…….. ३८...……..  ६६५ 
नवापूर - ७१८...….. १७...……. १७...……... ६८४ 
अक्कलकुवा -२५१.. ३...……….. ५......…... २४३ 
धडगाव - ..६८...….. २...……... २३...…….. ४३ 

एकूण - ७६५७...... १७०...……. ५४२...…... ६९४२ 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news coronavirus update sevan thousand patient cross