
शहरातील मंगळ बाजार परिसरातून बाजाराच्या दिवशी चौघा नागरिकांचे मोबाईल हरविले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वतंत्र पथक तयार करून मोबाईल चोरणारा संशयित वीरेंद्र सिलारे (वय २२, रा. झाडपा, ता. हरदा, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले असता, त्याच्या बॅगेत ६० महागडे मोबाईल आढळले.
नंदुरबार : शहरातील घरफोडी, चोरी व दुचाकी चोरीचे गुन्हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उघड झाले असून, अल्पवयीनांसह एका संशयिताकडून सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतून चोरी झालेल्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अवघ्या २४ तासांत दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस दलाने गुन्ह्याची उकल करून संशयित आरोपींना जेरबंद केले. याबाबत सविस्तर वृत्त असे, की नंदुरबार शहरातील नागाईनगरातील रहिवासी मुकुंद भट यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५८ हजारांचा मुद्देमाल लांबविला होता. गजबजलेल्या परिसरात घरफोडी झाल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात भीती निर्माण झाली होती. पोलिस अधीक्षक पंडित यांनी अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विजयसिंग राजपूत यांच्याशी चोरीच्या गुन्ह्यांबाबत गांभीर्याने चर्चा करून संशयितांना जेरबंद करण्याचे निर्देश दिले.
दोघांची माहिती मिळाली अन्
त्यानुसार राजपूत यांनी स्वतंत्र पथक तयार करून नंदुरबार शहरात रवाना केले. त्यांना नागाईनगरातील चोरी सिंधी कॉलनी परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी केल्याची गुप्त माहिती मिळाली. राजपूत यांनी पथकाला सूचना देऊन एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेत विचारपूस केली असता, नागाईनगरातील चोरीचा गुन्हा साथीदाराच्या मदतीने केल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणात फरारी अल्पवयीन मुलाच्या घरातून चोरीस गेलेले ५८ हजार रुपये किमतीचे दोन घरगुती सिलिंडर व घरगुती वस्तू जप्त केल्या आहेत.
९६ हजाराचा मुद्देमालही लांबविला
नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील रहिवासी राकेश माळी कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी ९६ हजारांचा मुद्देमाल लांबविला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आरोपींवर एका स्वतंत्र पथकाद्वारे लक्ष ठेवले. माळीवाडा येथे झालेली चोरी ही चिंचपाडा भिलाटी परिसरातील दोघा अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती मिळाली. पथकाने चिंचपाडा भिलाटी येथून संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, संबंधित गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयित अल्पवयीन मुलाने चोरी केलेला मोबाईल व ३५० रुपये रोख पोलिसांना दिले. त्याचा साथीदार फरारी झाला आहे.
शहरातील मंगळ बाजार परिसरातून बाजाराच्या दिवशी चौघा नागरिकांचे मोबाईल हरविले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वतंत्र पथक तयार करून मोबाईल चोरणारा संशयित वीरेंद्र सिलारे (वय २२, रा. झाडपा, ता. हरदा, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले असता, त्याच्या बॅगेत ६० महागडे मोबाईल आढळले. याबाबत त्यास विचारपूस केली असता, त्याने सदरचे मोबाईल सुरत येथून विकत आणल्याचे सांगितले. पुढील तपासासाठी संशयित व्यक्ती, तसेच अल्पवयीन मुलाला नंदुरबार शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ताब्यात घेतलेले चौघे अल्पवयीन मुले व एका संशयिताकडून एक लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासुळ, महिला पोलिस पुष्पलता जाधव, पोलिस शिपाई अभय राजपूत, आनंदा मराठे, पोलिस कॉन्स्टेबल सजन वाघ, प्रमोद सोनवणे, विकास अजगे, विजय ढिवरे, किरण पावरा, सतीश घुले यांच्या पथकाने संबंधित गुन्हे उघडकीस आणले.
संपादन ः राजेश सोनवणे