शहादा तोरणमाळ परिसरात गारपीट; गहूचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

तोरणमाळ येथे आज (ता.18) दुपारी अडीचच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पावसासह गारपीट सुरू झाली. यावेळी पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांची त्रेधातिरपीट उडाली.

शहादा (नंदुरबार) : राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ (ता. धडगाव) येथे गुरुवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसासह गारपीट झाली. जवळपास तीस मिनिट गारपीटसह पाऊस झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. शिवाय शेतकऱ्यांचे काही प्रमाणात गहू पिकाचे नुकसान झाले.
तोरणमाळ येथे आज (ता.18) दुपारी अडीचच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन पावसासह गारपीट सुरू झाली. यावेळी पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांची त्रेधातिरपीट उडाली. तर कापणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. जवळपास अर्धा तास चाललेल्या गारपिटीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

म्‍हसदीत गहू, हरभऱ्याचे नुकसान
म्हसदी (धुळे) : सोळागाव काटवान परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने रब्बीतला गहू, हरभरा, मका पाण्यात सापडला आहे. आज सायंकाळी काटवान परिसरातील म्हसदी, धमनार, ककाणी, भडगाव, राजबाईशेवाळी, बेहेड, काळगाव, चिंचखेडे, विटाई, निळगव्हाण, छाईल, प्रतापपूर, दिघावे, उंभरे, उंभरटी आदी भागात वादळी पाऊस झाला. कापणीला आलेला गहू, हरभरा पिक पाण्यात सापडले आहे. तर बेहेड शिवारात डाळिंब, द्राक्षे सारख्या फळ पिकांना फटका बसला आहे. 

दिघावेत गारांचा पाऊस..
दरम्यान विटाई, निळगव्हाण, दारखेल, दिघावे, छाईल, उभंरटी आदी ठिकाणी सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्या. गारा आणि अवकाळी पावसामुळे हातातोडांशी आलेला घास लहरी निसर्ग हिरावून नेणार आहे. अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या पिकांना अधिक धोका आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news hailstorm in toranmal area