esakal | हॉटेलमध्ये थांबवून जबरदस्‍ती देहविक्री; महिलेची फिर्याद

बोलून बातमी शोधा

prostitution women
हॉटेलमध्ये थांबवून जबरदस्‍ती देहविक्री; महिलेची फिर्याद
sakal_logo
By
टीम ई सकाळ

तळोदा (नंदुरबार) : पश्चिम बंगालमधील खिरकी बाजार येथील ३० वर्षीय महिलेने देहविक्रीसाठी आपणास फसवणूक करून थांबवून ठेवल्याच्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने शहरातील हॉटेल प्रियंका येथे तपासणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फिर्यादी तरुणीने सांगितलेले कथन खरे ठरल्यास तळोदासारख्या छोट्या शहरात बाहेरून देहविक्रीसाठी महिला व तरुणींना फसवून आणण्यासारख्या भयानक प्रकाराला पुष्टी मिळणार आहे. त्यामुळे याप्रकरणाची पाळेमुळे खोदून काढून ही प्रवृत्ती कायमस्वरूपी तळोद्यातून हद्दपार करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसावी, अशी तळोद्यातील नागरिकांची अपेक्षा आहे. त्यात हे प्रकरण कोणते वळण घेणार, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

आपल्या प्रेमीसोबत मुंबईला जाणाऱ्या तरुणीने फसवणूक होऊन आपणास जबरदस्तीने नंदुरबार येथे थांबवण्यात आले व त्यानंतर तळोदा येथील हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलमध्ये थांबावे लागेल, असे सांगून तेथेच देहविक्रयसाठी तयार व्हावे लागेल, अशी जबरदस्ती केल्याची फिर्याद १९ मार्चला नंदुरबार येथील उपनगर पोलिस ठाण्यात दिली होती. त्या फिर्यादीवरून तपासासाठी पोलिसांचे पथक २९ एप्रिलला तळोद्यातील शहादा रस्त्यावरील हॉटेल प्रियंका येथे आले होते. या तपासणीत किरकोळ मद्यसाठा मिळून आल्याची माहिती दिली होती.

हॉटेलवर अनेक छापे

मात्र महिलेच्या फिर्यादीत देहविक्रयसाठी आपल्यावर जबरदस्ती केल्याचे म्हटले होते. त्यामुळे याप्रकरणी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तळोदा येथे अशाप्रकारे फसवून इतरही महिला व तरुणींना याआधीही आणले गेले होते का? देहविक्रयचा हा व्यापार येथे आधीही सुरू होता का? येथे हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाला मिळालीच नव्हती का? या हॉटेलचा बिअर बार परवाना रद्द झाल्यानंतर तेथील इमारत सील केली नव्हती का? का केली गेली नाही? या हॉटेलवर यापूर्वीही अनेकदा छापे पडले होते, त्या वेळी काय कारवाई झाली? असे अनेक प्रश्न तळोदावासीयांना पडले आहेत.

महिनाभरानंतर तपासणी

दुसरीकडे या महिलेने १९ मार्चला फिर्याद दिली, तरी पोलिस पथक तब्बल २० दिवसांनी म्हणजे २९ एप्रिलला तपासणीसाठी कसे आले? फिर्यादीत नमूद व्यक्तींना तपासणीसाठी बोलावले होते का? त्यांच्यावर कोणती कारवाई झाली? असेही प्रश्न विचारले जात आहेत. तळोदा या छोट्या शहरात बाहेरून महिला व तरुणींना फसवणूक करून आणले जाते व त्यांना देहविक्रयसाठी तयार केले जाते हे समजल्यानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सत्य काय ते शोधून काढून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

इमारतीला सील लावा

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर एका बाजूला पेट्रोलपंप, तर दुसऱ्या बाजूला शैक्षणिक परिसर अशा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी फिर्यादीने नमूद केलेले हॉटेल आहे. तेथून रहिवासी परिसरही जवळच आहे. अशा हॉटेलमध्ये वारंवार गैरप्रकार उघडकीस येत असतील किंवा त्याची चर्चा होत असेल, तर कायमस्वरूपी त्या इमारतीला सील लावून तेथील परिसर बंद केला जावा, अशी अपेक्षा शहरवासीयांची आहे. अन्यथा गैरमार्गाच्या कोणत्याही थराला जाणाऱ्या या प्रवृत्तीचे फावतच राहील, असे बोलले जात आहे.