कोरोनाच्या लसीकरणातील ‘किरण’ शहाद्यातून..

कमलेश पटेल
Sunday, 17 January 2021

कोरोना महामारीवर उपाय म्‍हणून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. अर्थात भारतातच नव्हे; तर संपुर्ण जगात ज्‍याची मागणी होत आहे, त्‍या कोव्हिशील्‍डमध्ये एक आशेचा ‘किरण’ शहाद्यातून निघाला.

शहादा (नंदुरबार) : येथील पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी किरण सोनवणे यांनी कोरोनाविरोधी लसनिर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताने ‘कोविड-१९’पासून बचावासाठी कोव्हिशील्ड लस तयार केली आहे. त्या लसीला केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात मागणी आहे. 
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या कार्यरत असलेले व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी किरण सोनवणे यांनी कोव्हिशील्ड लस विकसित करण्यासाठी सक्रियपणे सहभाग नोंदविला. ही लस शनिवारपासून संपूर्ण देशात दिली जात आहे. परदेशातही मोठी मागणी आहे. 

साक्री येथील मुळ रहिवासी
सोनवणे मूळचे साक्री (जि. धुळे) येथील असून, त्यांनी २००७ मध्ये पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे प्रवेश घेतला. २०११ ला बी.फार्मसी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन काळात त्यांचा कल नेहमीच नवनवीन शोध व त्यावर उपाय यावर असायचा. 

अनेक नोकऱ्या सोडून ‘सीरम’मध्ये
त्यांनी विविध ठिकाणी नोकरी केली. सध्या ते पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, पी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. 
 
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (कै.) अण्णासाहेब पी. के. पाटील मानव व देशसेवेत येथील विद्यार्थी सदैव अग्रेसर असावेत, यासाठी आग्रही होते. त्यांचे स्वप्न साकारण्यास येथील प्राध्यापक व विद्यार्थी नेहमीच प्रयत्नशील असतात. किरण सोनवणे यांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून, त्यांचे अभिनंदन! 
- दीपक पाटील, अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news shahada kiran sonawane serum institute covaxin